सयाजी शिंदे यांच्या ‘Save सह्याद्री’ अभियानाला स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा ठाम पाठिंबा

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : कर्जत–भीमाशंकर परिसरात टॉरंट पॉवर प्रकल्पासह विविध विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीचा स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने तीव्र निषेध केला आहे. सह्याद्रीतील वृक्षतोड तातडीने थांबवून पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे.

या संदर्भात सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील आझाद मैदान परिसरातील मराठी पत्रकार संघात भारतीय जीवन व पृथ्वी रक्षण चळवळीच्या पुढाकाराने आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान समितीचे पदाधिकारी श्री. आमरेश पाथरे, श्री. मिलिंद प्रधान, श्री. विजय औटी, श्री. संजय धुरी आणि श्री. नितीन खेतले यांनी अभिनेते व निसर्गरक्षक, सह्याद्री-देवराई संस्थेचे संस्थापक श्री. सयाजी शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी समितीच्या वतीने ‘Save सह्याद्री – आपली सह्याद्री, आपले भविष्य वाचवण्यासाठी’ या पर्यावरण संरक्षण अभियानाला अधिकृत पाठिंबापत्र देण्यात आले. तसेच, सह्याद्रीच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या या लढ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सक्रियपणे सहभागी राहतील, अशी ग्वाही देण्यात आली.

सह्याद्रीचे जंगल, जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर महाराष्ट्राच्या भविष्याची लढाई आहे. या लढ्यात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती ठामपणे माननीय श्री. सयाजी शिंदे यांच्या पाठीशी उभी राहील, असे संघटनेचे सरचिटणीस आमरेश पाथरे यांनी सांगितले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment