माझ्या पंढरीची वारी जगात भारी : महेंद्रशेठ घरत 

Team RatnagiriLive
2 Min Read
  • स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासनाला सॅल्युट!

 उरण (विठ्ठल ममताबादे ) :  “माऊली माऊलीच्या जयघोषात, जय जय राम कृष्णा हरी नाम घोषात पंढरपूर दुमदुमले. अक्षरशः लाखो भक्तांचा महासागर पाहून मन तृप्त झाले. पंढरपूरचा शिवाजी चौक ते  विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदीला आलेला भक्तांचा महापूर ओलांडताना आणि असंख्य भक्तांच्या लाटा अंगावर झेलताना आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आणि आनंद मिळाला. दीनदुबळे, कष्टकरी विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले २० ते २५ लाख भाविक, दर्शनासाठी १५ ते २० किलोमीटर लांबच्या लांब लागलेल्या रांगा पाहून भक्तांच्या सहनशीलतेला आणि श्रद्धेला सलाम करायला हवा. मी जगभर फिरतो; नुकताच अमेरिकेत जाऊन अर्जेंटिना-स्पेन फुटबॉल अंतिम लढतच्या सामन्याचा सहपरिवार आनंद घेतला. तेथून १७ ते १८ तास प्रवास करून आल्यानंतर तातडीने पंढरपूर गाठले. कारण १९९७ पासून मी आषाढी एकादशीची वारी न चुकता दरवर्षी करतो. कोविडचा अपवाद वगळता माझ्या पंढरपूर वारीला २५ वर्षे झाली. त्यामुळे वारीतील भक्तांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद, सुख पाहून मला अभिमानाने म्हणावेसे वाटते, माझ्या पंढरीची वारी जगात भारी,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत शनिवारी (ता. २५) विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “वारीतील भक्तांचा कमालीचा शिस्तबद्धपणा, कुठलाही त्रागा न करता मिळेल त्या रस्त्याने हरिनामात तल्लीन झालेले भाविक, दर्शनासाठी जाताना जागा मिळेल तिथे तंबू ठोकलेले भाविक, तहानभूक विसरून माऊली माऊलीचा जयघोष करणारे वारकरी पाहून महाराष्ट्रात, संतांच्या भूमीत जन्माला आल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आषाढी एकादशी वारी हे महत्त्वाचे जणू वैभव आहे. तसेच लाखोंच्या गर्दीला आवरण्यासाठी स्वयंसेवक आणि पोलिस प्रशासन यांच्या कामगिरीला सॅल्युट करावासा वाटतो.”

शुक्रवारी महेंद्रशेठ घरत यांनी कांबे-रसायनी येथून पंढरपूर येथे दाखल झालेल्या दिंडीत सहभागी होऊन वारकरी यांच्यासोबत महाप्रसाद घेतला. यावेळी युवा अध्यक्ष निखिल ढवळे उपस्थित होते, तर शनिवारी चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तांच्या महासागरात महेंद्रशेठ घरत डुंबले. त्यानंतर त्यांनी तरघर, उलवे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रासादिक भजन मंडळाच्या दिंडीला भेट दिली. यावेळी मनोहर ओवळेकर, उत्तम कोळी आणि वारकरी बंधूंनी महेंद्रशेठ घरत आणि गुलाबशेठ घरत यांचे स्वागत केले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment