चिपळूणमधील लोककला महोत्सवात अभिनेता ओंकार भोजने सहभागी होणार!
चिपळूण: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्यावतीने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला लोककलांना जगभर पोहोचविणारा अभिनेता ओंकार भोजने याची खास उपस्थिती असणार आहे.
ओंकार भोजने याने मंगळवारी सायंकाळी वाचन स्मारक मंदिराला भेट दिली. या वेळी त्याला आयोजकांच्यावतीने प्रकाश देशपांडे यांनी त्याला लोककला महोत्सवाचे निमंत्रण दिले.
पुढील महिन्यात रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांचा हस्ते पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. श्री जुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अभिनेता ओंकार भोजनेही उपस्थित राहाणार आहेत.
अभिनेता ओंकार भोजने याची प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट दि. 20 जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला लोटिस्माच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. लोटिस्माच्या भेटीवेळी कवी अरुण इंगवले, प्रा. संतोष गोनबरे, विनायक ओक, सुनिल कुलकर्णी, डॉ. साहील दाभोळकर, योगेश बांडागळे, प्रियदर्शनी मोहिते यांच्यासह लोटिस्माचे संचालक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.