जलरंग रसिकांच्या मनाला उभारी आणतात : चित्रकार दिगंबर मांडवकर
जलरंग प्रात्यक्षिक ; कलाध्यापक संघाचा उपक्रम
संगमेश्वर दि. १३ : जलरंग मानवी मनाला उभारी आणतात . जलरंगात काम करणे तितकेसे सोपे नसले तरी सततच्या सरावाने जलरंगावर प्रभुत्व मिळवता येते. जलरंग माध्यम हाताळताना ते जलदगतीने हाताळावे लागते . कलाकाराला या माध्यमात काम करताना थांबायचे कधी आणि कोठे, हे समजणे खूप महत्वाचे असते, असे प्रतिपादन चित्रकार दिगंबर मांडवकर यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघातर्फे जे एस डब्लू फाऊंडेशनच्या सहकार्याने दोन दिवसांच्या कृतीसत्र आणि कार्यशाळेत जलरंगामध्ये प्रात्यक्षिक दाखविताना चित्रकार मांडवकर हे बोलत होते. जिल्हा कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष इमतियाज शेख यांनी मांडवकर यांची ओळख करुन दिली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष स्वरुप केळसकर , सचिव राजन आयरे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रात्यक्षिक दाखवताना मांडवकर यांनी निसर्गचित्राबद्दल माहितीही दिली. जलरंगांतील चित्र तीन स्टेप मध्ये पूर्ण करावे लागते. पहिल्या स्टेप मध्ये रेखाटन, दुसऱ्या स्टेप मध्ये रंगाचा पातळ आणि प्रवाही थर आणि तिसऱ्या अखेरच्या स्टेप मध्ये बारकावे दाखविणे अशा पध्दतीने काम पूर्ण करावे.अधिक वेळ काम करीत राहिल्यास कागदावर त्याचा विपरित परिणाम होतो, असेही मांडवकर यांनी नमूद केले. एका तासात दाखविलेल्या प्रात्यक्षिकानंतर उपस्थित कलाशिक्षकांनी टाळ्या वाजवून दिगंबर मांडवकर यांचे अभिनंदन केले. कार्यशाळेत विविध प्रात्यक्षिके पहायला मिळाल्याबद्दल उपस्थित कलाशिक्षकांनी समाधान व्यक्त केले.