रत्नागिरीत घुमले राज्यगीताचे सूर!
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यगीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न
पालकमंत्री उदय सामंत यांनी केले कार्यक्रमांचे कौतुक
रत्नागिरी दि.27(जिमाका): ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आज राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने राज्यगीत गायनाच्या उत्तम उपक्रमाने मराठी भाषा दिनाची सुरुवात आज होत आहे आणि हीच कवीवर्य वि.वा.शिरवाडकर यांना खऱ्या अर्थाने अर्पिलेली आदरांजली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
आज पोलीस परेड ग्राऊंडवर जिल्हा प्रशासन, जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीत गायन कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्यप्रणालीद्वारे ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित राज्यगीत गायन तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन उत्तमरित्या केल्याने पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, कार्यक्रमामध्ये सहभागी शाळा व महाविद्यालयांचे शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह म्हणाले की, अत्यंत कमी कालावधीमध्ये या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले. राज्यात दि.19 फेब्रुवारी रोजी राज्यगीताची घोषणा करण्यात आली आणि यापुढे प्रत्येक कार्यक्रमात राज्यगीत गायन होणार आहे. आज जिल्ह्यातील 3 हजार 112 शाळांमध्ये अंदाजे दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी राज्यगीत गायले,अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.एम.देवेंदर सिंह, यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, मराठी भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. मराठी भाषा दोन हजार वर्ष जुनी आहे. विविध प्रकारच्या साहित्याचा इतिहास मराठी भाषेमध्ये आहे.मराठी भाषा ही भारतातील तिसरी तर जगातील पंधरावी भाषा आहे. जेष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर यांच्या लहान बहिणीचे नाव कुसूम असे होते. कुसूम हिचे थोरले बंधू म्हणजे अग्रज यावरुन कुसुमाग्रज या नावाची निर्मिती झाली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. कुलकणी यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी मराठी भाषा व महाराष्ट्राची संस्कृती भव्यदिव्य आहे, असे सांगून त्यांनी मराठी भाषा गैारव दिनामित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रा.भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य, विविध ढोलपथकांचे ढोलवादन सादर केले. फाटक हायस्कूलच्या शिक्षकांनी यावेळी मराठी अभिमान गीत सादर केले.
कार्यक्रमाला विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शाळा महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिक असे मिळून जवळपास पाच हजाराहून जास्त संख्येने उपस्थित होते.