सावर्डे येथील सह्याद्री महाविद्यालयाच्या कलाकृती राज्यस्तरावर झळकणार !
पुण्यातील प्रदर्शनासाठी सह्याद्री कलामहाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड
संगमेश्वर : कोकणातील एक अग्रगण्य कला महाविद्यालय अशी राज्यात ओळख प्राप्त करणाऱ्या सावर्डे येथील सह्याद्री कलामहाविद्यालयात कला विषयक विविध उपक्रम सतत सुरु असतात . कलेत विविध प्रयोग करण्यात आघाडीवर असणाऱ्या या कलामहाविद्यालयातील विद्यार्थी विविध स्पर्धात सातत्यपूर्ण यश मिळवत असतात . राज्यात भरणाऱ्या नामवंत कलाप्रदर्शनात सह्याद्रीच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती नेहमीच असतात ही कोकणसाठी अभिमानाची बाब आहे . यावर्षी देखील राज्य कला प्रदर्शनासाठी सह्याद्री कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या कलाकृतींची निवड झाली आहे.
कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे दोन विभाग असतात. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि कला महाविद्यालयांसाठी खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते. या कलाप्रदर्शांत आपल्या कलाकृतीची निवड व्हावी म्हणून कलाविद्यार्थी जवळपास महिनाभर कमालीची मेहनत घेतात. आपली कलाकृती वेगळ्या माध्यमात आणि वेगळ्या शैलीची असावी यासाठी विद्यार्थी घेत असलेले परिश्रम अभिनंदनीय असतात . याबरोबरच विद्यार्थी आपल्या कलाकृतीबाबत जो विचार करतात , तो नक्कीच अचंबित करणारा असतो . ज्या कलाकृतींची राज्य कलाप्रदर्शनासाठी निवड होत नाही अशा कलाकृती देखील थक्क करणाऱ्याच असतात .
या वर्षी घेण्यात येणाऱ्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील व्यावसायिक विभागातून चित्रकार प्रा. प्रदीपकुमार देडगे,चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे यांची निवड झाली आहे. तसेच विद्यार्थी विभागातून १२ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. या वर्षीचे ६२वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच कलाकार विभागाचे मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे . यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणार हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
सह्याद्री कला महाविद्यालयातील कलाकृतींची निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे – मूलभत अभ्यासक्रम -कु.सार्थक आदवडे , कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष -कु. सुयश शिगवण , रेखा व रंगकाला विभाग – कु. ऋतिका शिरकर , शिल्प व प्रतिमानबंध कला – कु. प्रथमेश गोंधळी, कु. अध्वज चव्हाण, कु. प्रथमेश लिंगायत, कु. विशाल मसणे, कु. प्रितेश गोणबरे, कु. तुषार पांचाळ, कु. शुभम पांचाळ, कु. राहुल जाधव, कु. रोशन घडशी या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत.
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम , संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड , सेक्रेटरी महेश महाडिक , जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.