महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

स्थिर चित्रात छायाप्रकाशाचे महत्व अनन्यसाधारण : चित्रकार संजय शेलार

संगमेश्वर दि. १४ : कलाकाराने काम कोणत्याही माध्यमात केले तरी वस्तू चित्र आणि स्थिर चित्र यामध्ये फरक आहे. स्थिर चित्रात वस्तूंच्या निवडीसह, आकारमान, रेखाटन आणि छायाप्रकाश याला असणारे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत कोल्हापूर येथील प्रसिध्द चित्रकार संजय शेलार यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग रत्नागिरी, जे. एस. डब्लू फाऊंडेशन जयगड आणि रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांची कला कार्यशाळा आणि कृतीसत्र जयगड येथे जे एस डब्ल्यूच्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मध्ये संपन्न झाले. यामध्ये दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कोल्हापूर येथील प्रसिध्द चित्रकार संजय शेलार यांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रात्यक्षिका दरम्यान कलाध्यापकांजवळ संवाद साधताना चित्रकार शेलार हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कलाध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इमतियाज शेख, सचिव राजन आयरे,रुपेश पंगेरकर, स्पर्धाप्रमुख सुशील कुंभार, पराग लघाटे, उदय मांडे, प्रथमेश विचारे आदि मान्यवर उपस्थित होते. कलाध्यापक मोहन बुरटे यांनी प्रसिध्द चित्रकार संजय शेलार यांची ओळख करुन दिली. विविध प्रदर्शने, प्रात्यक्षिके आणि पारितोषिके प्राप्त केलेले संजय शेलार हे कोल्हापूर मधील एक ख्यातनाम चित्रकार म्हणून राज्यात आणि देशात प्रसिध्द आहेत. शेलार यांची चित्रे देश विदेशातील अनेक मान्यवरांच्या संग्रही आहेत. स्वतःच्या स्वतंत्र रंगशैलीसाठी शेलार यांची खास ओळख आहे. दररोज किमान एकतरी चित्र करण्यावर शेलार यांचा भर असतो. कलाक्षेत्रात प्रसिध्द असूनही सर्वांजवळ मिळून मिसळून आणि साधेपणाने वागणारा कलाकार अशी शेलार यांची ओळख आहे, अशी माहिती बुरटे यांनी दिली. आपल्या प्रात्यक्षिका दरम्यान कलाध्यापकांना मार्गदर्शन करताना चित्रकार संजय शेलार म्हणाले की, कलाध्यापक शाळेत वस्तूचित्र शिकवत असतात आज आपण वस्तूचित्र आणि स्थिरचित्र यातील फरक प्रात्यक्षिका दरम्यान समजून घेणार आहोत. स्थिरचित्राच्या मांडणीला मोठे महत्व आहे. विविध वस्तू मांडणी करण्यासाठी निवडत असताना त्यामध्ये कमी अधिक उंची, विविध रंग येणे अपेक्षित असते. स्थिर चित्रात छायाप्रकाशाला सर्वाधिक महत्व असल्याने, मांडणी करताना त्याचा विचार आधी करणे गरजेचे असते. स्थिर चित्राच्या मांडणी नंतर प्रथम कॅनव्हासवर केले जाणारे रेखाटन चारही बाजूने योग्य पध्दतीने झाले आहे अथवा नाही, हे पहावे. प्रथम बाह्यरेषा आणि नंतर टप्प्याटप्प्याने रंगभरण करावे. एकावेळी तीन पेक्षा अधिक रंगांचे मिश्रण केल्यास रंग उठावशीर दिसत नाहीत त्यामुळे रंगमिश्रण अत्यंत काळजीपूर्वक करावे असेही शेलार यांनी सांगितले. जवळपास सलग दोन तास काम करुन संजय शेलार यांनी हुबेहूब स्थिरचित्र साकारताच उपस्थित कलाध्यापकांनी टाळ्यांच्या कडकडाट करुन शेलार यांचे अभिनंदन केले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button