पटवर्धन हायस्कूलच्या शालेय दिनदर्शिकेचे प्रकाशन
रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारत शिक्षण मंडळ संचालित पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी तसेच कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक शाळा यांच्या शालेय दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा नमिता कीर यांच्या हस्ते तसेच सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
भारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी व पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक यांच्या संकल्पनेतून शालेय दिनदर्शिका साकारली आहे.
जून 2023 ते मे 2024 पर्यंतच्या शैक्षणिक वर्षातील पटवर्धन हायस्कूल मध्ये प्रत्येक दिवशी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम,सहशालेय उपक्रम यांची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना होणार आहे.
पटवर्धन हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांच्या छायाचित्रांनी दिनदर्शिकेची मांडणी सुंदररित्या करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी भारत शिक्षण मंडळाचे सचिव सुनील तथा दादा वणजू, सहसचिव संजयजोशी, खजिनदार नचिकेत जोशी यासह कृ. चि. आगाशे विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम
,पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे पर्यवेक्षक मनोज जाधव,सुतार सर व सत्यवान कोत्रे तसेच सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी दिनदर्शिका साकारण्यासाठी योगदान दिलेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला तसेच या कामी पृष्ठदान म्हणून आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा राजन बोडेकर यांनी केले.
पटवर्धन हायस्कूल मध्ये शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, क्रीडा,सांस्कृतिक असे अनेक नवनवीन उपक्रम सातत्याने व सुचारूपणे राबविले जातात.शालेय दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रशालेने अजून एक स्तुत्य असा उपक्रम साकारला आहे.