सप्रे कुटुंबातील भावंडांची वचनपूर्ती
आई-वडिलांच्या स्मरणार्थ ताम्हाने हायस्कूलला दोन लाखांची देणगी
देवरुख : माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाने या शाळेचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा झाला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याचदरम्यान आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. धामापूरचे माजी सरपंच कै केशव (नाना) सप्रे व त्यांची पत्नी कै. वासंती सप्रे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनीही मदतीचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत आज दोन लाखाची देणगी शाळेला देण्यात आली.
प्रशालेचे माजी विद्यार्थी; उद्योजक श्री सुनील सप्रे; सौ कल्पना (मुग्धा) सप्रे-पित्रे; सौ ज्योती सप्रे-हर्डीकर; सौ संध्या सप्रे- जोशी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला माजी विद्यार्थी मेळाव्यात दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. शाळेची इमारत जुनी झाल्याने तिची दुरुस्ती करण्यासाठी निधीची कमतरता भासत होती. सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त देणगी देऊन इमारत दुरुस्तीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सप्रे कुटूंबातील या भावंडानी देणगी जाहीर केली. हि देणगी आज सुनील केशव सप्रे आणि कल्पना (मुग्धा) सप्रे पित्रे यांनी संस्था अध्यक्ष श्री अशोक सप्रे यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष अनंत कुळे; संचालक श्री प्रभावळकर सर; मुख्याध्यापक श्री चोरमाले; सहाय्यक शिक्षक श्री अभिजीत सप्रे; गणेश माईन; कांबळे सर, मांडवकर सर उपस्थित होते.
सोलापूर येथे कारखानदार असणाऱ्या सुनील सप्रे यांनी यावेळी बोलतांना शाळेने आम्हाला घडवले म्हणूनच आम्ही प्रगती करु शकलो; आज शाळेला गरज असतांना आम्ही कर्तव्यभावनेतुन देणगी दिली आहे. एवढ्याशा देणगीतून शाळेचे आमच्यावरील ऋण कधीही फिटणार नाही अशी भावना व्यक्त केली.
सप्रे कुटुंबातील या भावंडांकडुन प्रेरणा घेऊन इतर माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री. अशोक सप्रे यांनी केले आहे