‘खल्वायन’च्या १४ जानेवारीच्या मासिक संगीत मैफलीत गोव्याच्या पृथा कुंकळ्येकर यांचे गायन
रत्नागिरी : खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची २८५ वी मासिक संगीत सभा शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणेच सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय, एस टी स्टँड समोर, रत्नागिरी येथे संपन्न होणार असून कै.गणपति दामोदर उर्फ अण्णा कर्वे ( कारवार ) स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजर्या होणार्या या मैफलीमध्ये गोव्याची युवा गायिका कु. पृथा सचिन कुंकळ्येंकर हिच्या शास्त्रीय- उपशास्त्रीय तसेच अभंग नाट्यगीत गायनाने सदरहू सभा रंगणार आहे.
कु. पृथा ही गोव्याची उदयोन्मुख युवा गायिका असून, गोव्याचे प्रसिद्ध गायक व मार्गदर्शक पंडित रामराव नायक यांचेकडे वयाच्या नवव्या वर्षापासून, गेली १४ वर्षे ती शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेत आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई येथून तिने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील संगीत अलंकार ही पदवी वयाच्या विसाव्या वर्षी प्राप्त केली आहे. सध्या ती शास्त्रीय संगीतात डॉक्टरेट करत आहे. गोवा विद्यापीठातून तिने बी कॉम(ऑनर्स) ही पदवी प्राप्त केली असून, सी.ए. होण्याचा तिचा मानस आहे. गायन क्षेत्रात सुद्धा करियर करण्याच्या दृष्टीने ती अनेक ठिकाणच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय मैफलीमध्ये सहभागी होत असते. रामनाथी देवस्थान, फोंडा-गोवा निर्मित व याच ठिकाणी सादर होत असलेल्या संगीत सौभद्र, संगीत मानापमान, संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकातून ती गेली ५ वर्षे प्रमुख भूमिका करीत आहे.
सदरहू मैफलीला साथसंगत श्री.निखिल रानडे (तबला) व श्री. संतोष आठवले (हार्मोनियम) हे रत्नागिरीचे नामवंत कलाकार करणार आहेत.
ही मैफल नेहमीप्रमाणेच सर्व रसिकांना विनाशुल्क असून,सर्वांनी उपस्थित राहून मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.