दिवा-रत्नागिरी पॅसेंजरची वेळ बदलली; धावणार फास्ट पॅसेंजरप्रमाणे
१५ मार्चपासून गाडी सुधारित वेळापत्रकानुसार धावणार!
रत्नागिरी : मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीपर्यंत जाणारी दिवा ते रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी दिनांक १५ मार्चपासून आपल्या डाऊन मार्गावरील प्रवासात अधिक वेगवान होणार आहे. कोकण रेल्वेने गाडी सुधारित वेळापत्रकानुसार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी दादर येथून चालवण्यात येणारी ही गाडी अजूनही दादर येथून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेले नाही. आता या गाडीचा वेग वाढवण्याबरोबरच ही गाडी दादरवरून कधी सोडली जाते, याकडे सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणावासीयांच्या मागणीनुसार ही गाडी दादरपर्यंत नेण्याची सूचना मध्य तसेच कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली आहे.
दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावणारी 50103 दिनांक 15 मार्चपासून सुधारित वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहेत. आता ही गाडी दिवा येथून संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला ती आधीच्याच वेळेवर रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी पोचणार आहे. सध्या ही गाडी दिवा जंक्शन येथून संध्याकाळी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटते आणि रत्नागिरीला ती रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी पोहोचते. या गाडीची निर्धारित ठिकाणी पोहोचायची वेळ तीच ठेवण्यात आली आहे.
कोरोना पश्चात या गाडीचे काही थांबे वगळण्यात आले आहेत. थांबे वगळण्यात आले असले तरी गाडीच्या प्रवास वेळेत बचत न होता. दिवा ते रत्नागिरी या प्रवासासाठी तब्बल नऊ तास 15 मिनिटे लागत होती. आता सुधारित वेळापत्रकामुळे ही गाडी सहा तास 45 मिनिटात रत्नागिरी पोचणार आहे. यामुळे डाऊन दिशेने धावताना दिवा रत्नागिरी पॅसेंजर प्रवास वेळेस तब्बल अडीच तासांची बचत करून फास्ट पॅसेंजरप्रमाणे धावणार आहे.