मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे : अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे
मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी : मराठी भाषा ही आपली बोली भाषा असून या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असणे तसेच आपण सर्वांनी मराठी भाषेचा वापर सर्वत्र करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी आज मालगुंड येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा समिती, रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज कवी केशवसूत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी तहसिलदार (सर्वसाधारण) हनुमंत म्हेत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, कवी केशवसुत स्मारक चे अध्यक्ष गजानन पाटील , कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालुगुंड शाखा अध्यक्षा नलिनी खैर आदि मान्यवर उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे आपल्या मनोगतपर भाषणात पुढे म्हणाल्या की, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, तिचा प्रचार, प्रसार व्हावा,या उद्देशाने जिल्हा मराठी भाषा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा पंधरवडा असे आदि उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा संवर्धनानुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोठया प्रमाणावर उपस्थित असलेल्या स्पर्धकांना त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.
अरुण मोर्ये यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कवी केशवसूत स्मारक येथे मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मराठी भाषा संर्वधनासाठी लोककला यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरुपात आयोजित करण्यात येऊन यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ आदि लोककलांचा आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच कविवर्य केशवसूत व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य गजानन पाटील यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगितला.