मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान मंगळवारी सकाळी घेण्यात आलेल्या तीन तासांच्या मेगाब्लॉकमुळे पाच ते सहा गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. रेल्वेचा हा मेगा ब्लॉक पूर्वनिर्धारित असला तरी विलंबाने धावू शकणाऱ्या संभाव्य गाड्यांच्या शिवाय इतर गाड्यांनाही विलंबाचा फटका बसला. या गाड्यांमध्ये जनशताब्दी एक्सप्रेससह तेजस एक्सप्रेसचाही समावेश होता.
कोकण रेल्वेच्या मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान मंगळवारी सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत पूर्वनिर्धारित मेगाब्लॉक घेण्यात आला होता. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेने हा पूर्वनिर्धारित मेगाब्लॉक घेतला होता. यामुळे तिरुनेलवेली ते जामनगर तसेच तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाड्या ब्लॉकच्या कालावधीत विलंबाने धावणार असल्याचे रेल्वेने आधीच जाहीर केले होते.
मात्र प्रत्यक्षात या दोन गाड्यांव्यतिरिक्त इतर गाड्यांनाही विलंबाचा फटका सहन करावा लागला.
कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावरील गाड्यांच्या लाईव्ह स्टेटसनुसार कोईमतुर ते जबलपूर ही गाडी 21 मिनिटे, जामनगर एक्सप्रेस ही गाडी दोन तास 57 मिनिटे, मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस एक तास 34 मिनिटे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस एक तास, मुंबईतून मडगावच्या दिशेने येणारी जनशताब्दी एक्सप्रेस सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती.
संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकमुळे पुण्यातील काही गाड्या चिपळूणसावर्डे, आरवली तर काही गाड्या रत्नागिरीला थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
- हेही वाचा : Konkan Railway| यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणार मेमू स्पेशल ट्रेन!
- Konkan Railway | गणेशोत्सवातील वंदे भारत एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी २०० पार!