मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानाचा रत्नागिरीतील सर्वपक्षीय बैठकीत निषेध
रत्नागिरी : रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्जना कार्यक्रमात इस्लामविरोधी व मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते. या विषयाचा निषेध करण्याकरिता रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आक्षेपार्ह विधान करणारे धनंजय देसाई आणि या कार्यक्रमाचे आयोजकांचा निषेध करण्यात आला. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या नुकत्याच आलेल्या निर्णयानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
रत्नागिरीतील हिंदू व मुस्लिम बांधवांची एकजूट कायम राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व रत्नागिरी मध्ये हे धार्मिक द्वेषाचे विष पेरणाऱ्यापासून सावध राहण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले. या सभेमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश शहा व राष्ट्रवादीचे नेते बशीर भाई मुतुर्झा यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या धनंजय देसाई याचा व या कार्यक्रमांच्या आयोजकाचा तीव्र निषेध करणारा ठराव मांडला. या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे यांनी अनुमोदन दिले.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर याबद्दल हे मी शब्द वापरून त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करून मुसलमानांना आतंकी म्हटल्याबद्दल धनंजय देसाई याच्यावर जोरदार शब्दात टीका करून सर्व मुसलमान आतंकवादी आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांनी का केले नाही याचा जाब ही विचारला.
रत्नागिरीमध्ये येऊन कोणी समाजामध्ये जातीय द्वेषाचे विष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही खपवून घेणार नाही आणि रत्नागिरी कर अशा समाजकंटकाच्या प्रयत्नांना बळी पडणार नाहीत, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना नेते प्रमोद शेरे, आरपीआयचे नेते एल. व्ही. पवार, शिवसेना शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, कुमार शेटे, काका तोडणकर यांनी व्यक्त केली
या बैठकीचे आयोजन मुफ्ती तौफीक, फरहान मुल्ला, नौशिन काझी, ताहीर मुल्ला, आतिफ साखरकर, साहिल खान, निहाल झापडेकर यांनी केले. यावेळी निसार दर्वे, जुबेर, नदीम सोलकर, इम्तीयाज पटेल, साबीर पावसकर, इमरान सय्यद व अन्य शेकडो लोक उपस्थित होते.