रत्नागिरी जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून “आयुष्मान भव” मोहीम
रत्नागिरी, दि. ३१ : सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत “आयुष्मान भव” मोहीम हाती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
राज्यासह जिल्ह्यामध्ये दि.१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये “आयुष्मान भव” ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अबालवृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. मोहीम चार उपक्रमांद्वारे जिल्ह्यात राबविण्यात येईल.
१) आयुष्मान आपल्या दारी ३.०, २) आयुष्मान सभा, ३) आयुष्मान मेळावा, ४) अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी.
आयुष्मान आपल्या दारी ३.० या उपक्रमामध्ये सर्व जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा-सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामआरोग्य पोषण समिती मार्फत आयुष्मान कार्ड व आभा कार्ड बाबत जनजागृती, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
आयुष्मान मेळावा अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी किंवा रविवारी असांसर्गिक आजार (मधुमेह,रक्तदाब,कॅन्सर-तोंड, गर्भाशय मुख,स्तन) याबाबत तपासणी, क्षयरोग, कुष्ठरोग, इतर संसर्गजन्य आजार,माता व बाल आरोग्य, संतुलीत आहार व लसीकरण, नेत्रचिकित्सा यांबाबत चार आठवड्यामध्ये तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून आठवड्याला किमान एक आरोग्य मेळावा घेण्यात येणार आहे.
अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची (०-१८ वयोगट) विशेष मोहीम राबवून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मुलांची ३२ सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास या मुलांच्या जिल्हा स्तरावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यांना आवश्यक उपयुक्त साहित्य (उदा.चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर) देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
वरील उपक्रमांसोबतच दि.१ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान सर्व आरोग्य संस्थांमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असून त्यामध्ये सर्व संस्थांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.