लोकसंख्या वाढीमुळे होणारे स्थलांतर चिंताजनक : सुकुमार शिंदे
रत्नागिरी : जगात लोकसंख्या वाढत असताना रोजगारासाठी होणारे स्थलांतर हे चिंताजनक आहे. शासनाने त्यासाठी रोजगाराची दालने खुली करायला हवीत. शिवाय लोकसंख्या नियंत्रणाच्या उपाययोजना राबवायला हव्यात, असे प्रतिपादन नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुकुमार शिंदे यांनी केले. ते एस पी हेगशेट्ये महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिक शास्त्र विभाग आयोजित लोकसंख्या नियंत्रण दिन कार्यक्रमात बोलत होते.
एस पी हेगशेट्ये महाविद्यालयात दरवर्षी लोकसंख्या नियंत्रण दिन साजरा करण्यात येतो. यावेळी अनोख्या पद्धतीने हा दिन साजरा करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धा आणि पोस्टरमेकिंग स्पर्धा घेण्यात आली. त्यातील अनुक्रमे निबंध स्पर्धेत संतोषी बाबर, सिमरन सारंग, पायल कळंबटे तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत मानसी घाडी, वहिदा पावसकर, रोझीन ठाकूर या प्रथम तीन क्रमांकांना प्रमुख पाहुणे सुकुमार शिंदे, प्राचार्य डॉ. आशा जगदाळे, कलाविभागप्रमुख डॉ. पूजा मोहिते यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ आशा जगदाळे म्हणाल्या, आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येकाने समाजभान राखायला हवे. त्यानुसार लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी जनजागृती करावी. लोकसंख्या वाढीमुळे निर्माण झालेल्या वाढत्या बेरोजगारीवर उपाययोजना म्हणून नवीन उद्योगधंदे, व्यवसाय सुरु करावेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वर्षा कुबल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुशील साळवी यांनी केले तर आभार डॉ. पूजा मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिक शास्त्र विभागाच्या प्राध्यापक, विद्यार्थी यांनी केले.