Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसच्या खेड थांब्याबाबत आली सुखद बातमी!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या खेड स्थानकावरील थांब्याबाबत एक सुखद बातमी हाती आली आहे. भारतीय रेल्वेच्या या हायटेक गाडीला रेल्वे बोर्डाने चिपळूण ऐवजी खेड थांबा दिल्याने अनेकांना आश्चर्याचा तर अनेकांना सुखद धक्का बसला होता.
मुंबई ते मडगाव मार्गावर स्वदेशी बनावटीची हायटेक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याची चर्चा झाल्यापासून या गाडीला कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड थांबा देण्याचा विचार व्हावा, या संदर्भात कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर याची दखल घेत रेल्वेने तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. रेल्वे बोर्डाने अखेर वंदे भारत एक्सप्रेसला खेड थांबा मंजूर केल्याने खेडवासीयांना सुखद धक्का बसला होता. दिनांक 27 जून पासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरू झाल्यापासून काही फेऱ्यांचा अपवाद वगळला तर ही गाडी प्रवाशांनी भरून धावत आहे. विकेंडच्या कालावधीत तर या गाडीच्या फेऱ्यांना तर गर्दी होत आहे.
१२ जुलै २०२३ रोजी ची ताजी स्थिती
२२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस
पहिल्या बुकिंग चार्टनुसार खेड स्थानकावरला उतरणारे प्रवासी पुढीलप्रमाणे :
एसी चेअर कार ८१ (एका मोठ्या चेअर कार डब्याची क्षमता ७८)
एक्झिक्युटिव्ह क्लास ३ (कोच क्षमता ४४ )
अशातच वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावरून लाभत असलेल्या प्रतिसाद्वाबाबत सुखद बातमी हाती आली आहे. गाडीचे तिकीट महागडे असल्याने गाडीतून कोण प्रवास करणार, अशी चर्चा एकीकडे होत असतानाच वंदे भारत एक्सप्रेसच रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरा थांबा असलेल्या खेड स्थानकावरून या गाडीला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर दि. 10 जुलै 2023 रोजीच्या डाऊन वंदे भारत एक्सप्रेस (22229)मधून 74 प्रवासी हे एकट्या खेड स्थानकावर उतरले. वंदे भारत एक्सप्रेसच्या एका कोचची क्षमता 78 प्रवाशांची आहे. म्हणजे जवळपास या गाडीच्या अख्ख्या एका कोचचे बुकिंग हे खेडला उतरणाऱ्या प्रवाशांकडून झाले. खेड स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस ला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत ही दिलासादायक बाब ठरली आहे.
हेही वाचा : Konkan Railway| यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणार मेमू स्पेशल ट्रेन!
खेडमध्ये लोटे औद्योगिक क्षेत्र असल्याने मुंबई तसेच ठाण्यातून एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये येणाऱ्या अधिकारी वर्गामुळे वंदे भारत एक्सप्रेस च्या एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी देखील खेड स्थानकासाठी बुकिंग होताना दिसत आहे. त्यामुळे थांबण्यासाठी पाठपुराव्या करणाऱ्या खेडवासीयांना कोकण रेल्वेने न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.