विभागीय शिक्षक भरतीसाठी रत्नागिरीत २३ रोजी धरणे
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निर्णयाला समर्थन, शासन निर्णय काढण्याची मागणी, जि. प.च्या सुमारे २ हजार जागा रिक्त
रत्नागिरी : कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षात आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे कोकणातील शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरतीत विभागस्तरावर शिक्षक भरती करावी व स्थानिकांना त्यात आरक्षण द्यावे, यासाठी कोकण डीएड्, बीएड्धारक संघटना रत्नागिरीत गुरुवार दि. 23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करणार आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, रमजान गोलंदाज, विजय आखाडे, प्रभाकर धोपट, कल्पेश घवाळी, भालचंद्र दुर्गवले, राजेश इंगळे, ओमकार मयेकर, दिगंबर चौगुले, गौरी जोग, श्रध्दा कदम, सुदीप कांबळी यांनी माहिती देताना सांगितले की, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती विभाग स्तरावर करण्याचे आश्वासन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले आहे. या निर्णयाला आम्हा कोकणातील डी.एड्., बी.एड्. धारकांचा पाठिंबा आहे. या शिक्षक भरतीसाठी टीएआयटी परीक्षा झाली असून भरती प्रक्रिया काही दिवसांनी सुरू होणार आहे. तत्पूर्वी विभागीय शिक्षक भरतीचा शासन निर्णय निर्गमित करून विभागीय आरक्षणाची टक्केवारी जाहीर करावी, अशी आमची मुख्य मागणी आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या विभागीय भरती प्रकियेच्या निर्णयामुळे कोकणातील शाळांना स्थानिक शिक्षक मिळतील. तसेच जिल्हा बदलीच्या समस्येवर तोडगा निघून येथील विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल. शाळांमध्ये बोली भाषेतून शिकवायला शिक्षकही मिळतील. यासाठी विभागीय शिक्षक भरतीचा निर्णय योग्यच असून शिक्षणमंत्र्यांच्या समर्थनासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत.
शिक्षकांच्या नोकर्यांचे खासगीकरण थांबवावे, विभागीय स्तरावर शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय निर्गमित करून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. विभागीय आरक्षणाबाबत टक्केवारी जाहीर करावी. त्यात विभागाला 70 टक्के व उर्वरित राज्याला 30 टक्के आरक्षण देण्यात यावे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलेली सुमारे 30 हजार रिक्त पदे एकाच टप्प्यात भरण्यात यावीत.
कोकणातून होणार्या जिल्हा बदलीमुळे जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1300 पदे रिक्त असून 700 शिक्षक जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पूर्ण करावी, अशा मागण्या या संघटनेने केल्या आहेत.
यापूर्वी जिल्हा स्तरावर होणारी शिक्षक भरती 2010 सालापासून राज्य स्तरावरून होऊ लागली. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा येथील 80 टक्के शिक्षकांची कोकणातील जिल्ह्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली. सन 2011 साली रत्नागिरी जिल्ह्यात 1022 जागांवर फक्त 44 स्थानिक तरुण नोकरीला लागले. बीड जिल्ह्यातील 700 पेक्षा जास्त शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला लागले. ते व इतर जिल्ह्यातील शिक्षक आता बदली करून आपापल्या गावी निघाले आहेत. परंतु इथले स्थानिक डीएड, बीएड धारक अजून घरीच आहेत. 2017 साली झालेल्या भरतीतही जेमतेम 30 ते 40 स्थानिक उमेदवार शिक्षक म्हणून रुजू झाले. जिल्हा बदलीमुळे सद्यस्थितीला रत्नागिरी जिल्ह्यात 1 हजार 300 पदे रिक्त आहेत. त्यात आता 700 शिक्षक जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत असून काही दिवसांत ते कोकण सोडणार आहेत. यामुळे येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकच कमी उरले आहेत. तीस टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी रत्नागिरीप्रमाणे रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमधील जि. प. च्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे. त्यासाठी विभागीय शिक्षक भरती करावी, अशी आमची मागणी असल्याचे या संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. यापुढे हे आंदोलन रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
विभागीय भरतीच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा
जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षक भरती करताना जर स्थानिकांना आरक्षण मिळाले तरच शिक्षकांच्या जिल्हा बदलीचा विषय मार्गी लागू शकतो. आमदार शेखर निकम यांनी हा मुद्दा यापूर्वीच्या अधिवेशनात मांडला. विभागीय भरती करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले, परंतु याबाबत शासन निर्णय अद्याप झालेला नाही. शासन निर्णय झाल्यानंतर तरी ठराविक टक्के आरक्षण प्रत्येक विभागातील उमेदवारांना मिळाले तर अनेक स्थानिक शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांना मिळतील. त्यामुळे जिल्हा बदली करून जाणार्या शिक्षकांचे प्रमाण कमी होईल.