विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे शिक्षक होता आले पाहिजे : डॉ. विवेक सावंत
- नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण परिषदेचे आयोजन
रत्नागिरी : विद्यार्थी महाविद्यालयात आले पाहिजे आलेले टिकले पाहिजेत टिकलेले शिकले पाहिजेत आणि शिकलेले कमावते झाले पाहिजे हे ध्येय शिक्षकांनी, शिक्षण संस्थाचालकांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे शिक्षक होता आले पाहिजे केवळ माहितीचे आदान प्रदान न होता त्यातून ज्ञानही मिळणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन एमकेसीएलचे संचालक, मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांनी केले.
येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळा एस. एम. विद्यानिकेतन परिसरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त “बदलते जग बदलते शिक्षक” याविषयावर शिक्षण परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील, युवा उद्योजक असीम हेगशेट्ये, डॉ. सौ. हेदर हेगशेट्ये, एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओच्या संचालिका ऋतुजा हेगशेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्राध्यापक, शिक्षक कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतात, याची सविस्तर माहिती यावेळी डॉ. सावंत यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, “गेल्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे अनाकर्षक वर्गखोल्या.. त्यामुळे आकर्षक म्हणजे ज्ञानाने, उत्साहाने परिपूर्ण असलेल्या वर्गखोल्या तयार करणे ही प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना आपल्या विषयावर आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करता आले पाहिजे. विद्यार्थ्यांवर असलेले प्रेम म्हणजे विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि हे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा.”
शिक्षण परिषदेच्या समारोपाप्रसंगी बोलताना ‘नवनिर्माण’चे चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनी आताचा काळ बदलला असल्याचे नमूद करताना पूर्वी महाविद्यालयात प्रवेश मिळणे हा उद्देश होता, पण आता ज्ञान मिळवणे हा उद्देश असल्याचे सांगितले. ज्ञानाची कवाडे खुली करताना ती विद्यार्थ्यांच्या हृदयात आणि पालकांच्या मनातही खुली झाली पाहिजेत, तरच शैक्षणिक क्रांती होईल, असे मत व्यक्त केले. मोबाईलमध्ये अडकलेली तरुणाई हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मात्र मोबाईल हे ज्ञान मिळवण्याचे साधन ही आहे. मोबाईलवर सर्व प्रकारची माहिती, ज्ञान मिळत असल्याने मुलांना वर्गात आणणे हे आजच्या घडीला मोठे आव्हान आहे.
या शिक्षण परिषदेला वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी डॉ. सावंत यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्याचे आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालय परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रमोद मुझुमदार, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्यवाह परेश पाडगावकर, उपाध्यक्ष डॉ. अलीमियाँ परकार, कोषाध्यक्ष शरद कदम, संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, प्रा. प्रकाश पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. प्रा. दीपाली तावडे, प्रा. सचिन गिजबिले यांनी आभार मानले.
दुपारच्या सत्रात दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) आणि संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांचा ‘कलाविष्कार तरुणाईचा’ हा कार्यक्रम झाला. सायंकाळच्या सत्रात ‘नवनिर्माण फेस्ट’ हा कर्मचारी स्नेहमेळावा आयोजित केला होता.