रत्नागिरी अपडेट्स

संगमेश्वरमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प

महामार्गावर झाडे तोडताना ठेकेदाराचा निष्काळजीपणा

आंब्याचे मोठे झाड जेसीबीवर कोसळले

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरच्या जवळ सध्या महामार्गाच्या दुतर्फा असणारी भलीमोठी झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना केलेला निष्काळजीपणा झाडे तोडणाऱ्या ठेकेदाराला चांगलाच भोवला. पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ एक भलामोठा आंबा तोडताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने आंब्याचे झाड तोडताना ते विरुध्द बाजूला जेसीबीवर येवून पडले. सुदैवाने यामध्ये जिवीतहानी हानी झाली नसली तरीही महावितरणचे दोन पोल मोडून विद्युतवाहिन्या तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. याचबरोबर जवळपास एक तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहनचालक आणि पादचारी आधीच ठेकेदरांकडून होणाऱ्या विविध त्रासांना कंटाळले असताना आता झाडे तोडतना होणारा निष्काळजीपणा वाहनचालकांच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण म्हणजे वाहनचालकांसाठी एक डोकेदुखीचा भाग झाला आहे . गेली १२ वर्षे म्हणजे एक तप उलटले तरीही चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जावू शकलेले नाही. या मार्गाचे काम करणारे ठेकेदार न्यायालयाचे आदेश मानत नाहीत आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाहीत हे बावनदी ते आरवलीपर्यंत असणाऱ्या खड्यांकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. संगमेश्वर येथील हातावर पोट असणाऱ्या छोट्या टपरीधारकांना देशोधडीला लावून या जागेवर एक इंच देखील काम केलेले नाही . महामार्गाचे चौपदरीकरण करणारे ठेकेदार मनमानी करत असताना लोकप्रतिनिधी मात्र सारे शांतपणे सहन करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संगमेश्वर जवळ सध्या रस्त्याच्या दुतर्फा असणारी मोठी झाडे झटपट तोडण्याचे काम सुरु आहे. यासाठी पोकलेन, जे सी बी आणि क्रेन सारखी यंत्रणांचा वापर केला जात आहे. मात्र, मोठी झाडे तोडताना सुरक्षेचे कोणतेही उपाय केले जात नसल्याने आज ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एक मोठे आंब्याचे झाड दोरी तुटून थेट जेसीबीवरच कोसळले. यामुळे महावितरणचे दोन लोखंडी पोल पिळवटले गेले. विद्युतवाहिन्या तुटून पडल्या आणि अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला. या सर्वाला संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप उपस्थित वाहनचालकांनी केला. आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. ठेकेदाराने झाडे तोडताना जीर्ण झालेल्या दोऱ्या वापरल्या आणि खबरदारीचे कोणतेही उपाय योजले नसल्याने सदरची घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले . या झाडांच्या बाजूला महावितरणच्या विद्युतभारीत तारा आणि पोल आहेत. मात्र महावितरणला याबाबत कोणतीही कल्पना न दिल्याने विद्युतप्रवाह सुरु असतानाच हा दुर्दैवी प्रकार घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदारांनी आतातरी लोकांच्या जीवाशी असणारा खेळ थांबवावा. जनता या त्रासाला कमालीची कंटाळली आहे. एकदिवस या त्रासाचा कडेलोट झाला तर त्रस्त वाहनचालक आणि पादचारी उत्सफुर्तपणे रस्त्यावर उतरतील असा इशारा संघर्ष समितीच्या पर्शुराम पवार यांनी दिला आहे.

बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदाराच्या अधिपत्याखाली काम करताना दिसत आहेत. पावसाळ्यानंतर दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप खड्डे भरले जात नाहीत. न्यायालयाचे आदेश ठेकेदार पायदळी तुडवत आहे. केल्या जाणाऱ्या कामाचा दर्जा तपासला जात नाही असाही आरोप पवार यांनी केला आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button