‘नासा रिटर्न’ लांजातील शिरवलीच्या सुमेध जाधवला करायचेय अंतराळ अभियांत्रिकीमध्ये करिअर!
लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा कुमार सुमेध सचिन जाधव याने अंतराळ अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचे असल्याचे उत्तुंग स्वप्न बाळगले आहे. त्याच्या या जिद्दीला या शाळेतील शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी हात दिला आहे. नुकताच अमेरिकेतील ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देऊन परतलेल्या सुमित जाधव प्रेरणादायी यश कहाणी त्याच्या मनोगतातून समोर आली आहे. ‘रत्नागिरी लाईव्ह’ पोर्टलशी बोलताना सुमित जाधव याचा ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास अक्षरशः ओसंडून वाहत होता.
रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत नासा व इस्रो निवड चाचणी परीक्षेत लांजा तालुक्यातील जि. प. शाळा शिरवलीच्या विद्यार्थ्यांचे सुयश उल्लेखनीय असे होते. विद्यार्थ्यांची ही गगन भरारी कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी जगविख्यात अंतराळ संशोधन संस्था नासा व अमेरिकेतील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी देऊन नुकतेच माघारी परतले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील २० टॉपर्स विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यासाठी निवडले गेले होते. त्यापैकी जि.प.शाळा शिरवलीचा कु. सुमेध सचिन जाधव हा होता. विशेष म्हणजे शिरवली शाळेचा सलग दुसऱ्या वर्षी नासाला गेलेला हा विद्यार्थी. गतवर्षी कु.आशिष अनिल गोबरे हाही विद्यार्थी नासाला जावून आला. शिरवली शाळेची ही सर्वोत्तम कामगिरी कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान’ या उपक्रमांतर्गत नासा व इस्त्रो भेट चाळणी परीक्षा असा आदर्शवत उपक्रम राबविला.या परीक्षेतील टॉपर्सना इस्त्रो व नासा भेटीची संधी उपलब्ध करून दिली.
५ जून ते १८जून असा अभ्यास दौरा करून हे विद्यार्थी रत्नागिरीत परतले. रत्नागिरी येथे या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम्. देवेंद्र सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी स्वागत करुन संवाद साधला. तसेच लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग व पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी लांजा येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले.
सायंकाळी सुमेध जाधव शिरवली गावी पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत करीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकही काढली. सरपंच तेजिता प्रसन्न राजापकर, शिरवली बौध्दजन विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष विजय जाधव, सचिव सत्यविजय मांडकुलकर, शिरवली बौध्दजन विकास मंडळ (ग्रामीण)चे अध्यक्ष सुरेश जाधव, सचिव विठ्ठल जाधव, माजी सरपंच अन्वर रखांगी, पोलिस पाटील प्रकाश राजापकर, सखाराम जाधव, मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, मार्गदर्शक शिक्षक उमेश केसरकर, श्रद्धा दळवी, संदीप घोरपडे, सुमेदचे आजी आजोबा, आईवडील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.
सुमेधचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करुन महिलांनी औंक्षण करुन ढोलताशांच्या गजरात धुमधडाक्यात स्वागत केले. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पेढे वाटले गेले.आपल्या गावातील दुसरा विद्यार्थी अमेरिकेत जाऊन आला याचा आनंद सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
सुमेधशी संवाद साधल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. खेडेगावातील मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलाला अमेरिकेची संधी मिळाली याबद्दल त्याने जिल्हा परिषद रत्नागिरी व मार्गदर्शक शिक्षक उमेश केसरकर, मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, श्रद्धा दळवी, संदीप घोरपडे,आईवडीलांचे आभार मानले.
अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रामधील एटीएक्स प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये अंतराळ स्थानकाची दुरुस्ती, ग्रहावरील खजिन्यांचा शोध, अंतरायानातून प्रवास, अंतराळात प्रक्षेपण प्रणाली व नियंत्रण कक्षाची अनुभूती घेतली. अंतराळवीरांचा पोशाख, त्यांची वैशिष्ट्ये तसेच विविध उपकरणे याबद्दलची माहिती येथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. नासा सेंटर येथील रॉकेट गार्डनला भेट देऊन येथील विविध रॉकेट अटलांटिस स्पेस शटल यांची माहिती जाणून घेतली. संवाद साधला.. हे सारे अविस्मरणीय क्षण आहेत.
‘नासा’ला भेटीवर जाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. मला खूप आनंद होतं होता. मी नासाची थोडीशी माहिती घेतली होती. मी ही सर्व माहिती गूगल व युट्यूबवरुन मिळवली होती. मला वाटलं की तिथे फक्त राॅकेट्स असतील पण तिथे वेगवेगळ्या राइड्स पण होत्या.
–सुमेध जाधव, जिल्हा परिषद शाळा शिरवली, तालुका लांजा, जि. रत्नागिरी.
नासात जायचे असेल तर सर्वात महत्वाचे विज्ञान व खूप धडपड असते. मला नासामध्ये अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र खूप आवडले. तेथील लोक खूप मेहनत करत होते. मला अभ्यास करून तेथे जायला निश्चितच आवडेल. या साऱ्या प्रवासात मला खूप काही शिकता आले. नवीन नवीन खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळाली. माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे.याचा मला पुढच्या शिक्षणासाठी निश्चितच उपयोग होईल.
ऑरलॅंडो- केनेडी स्पेस सेंटरसह न्यूयाॅर्कमधील स्टॅचू ऑफ लिबर्टी, वर्ल्ड ट्रेड सेंटर ,मॅनहॅटन ब्रिज, लाॅस ऍंजलेसमधील युनिर्वसल स्टुडिओ, सॅन फ्रांसिस्कोमधील ॲपल व गुगलचे मुख्य कार्यालय, शहर भ्रमंती करता आली. काही ठिकाणी अमेरिकेतील भारतीय लोक भेटले. त्यांनी चौकशी केली. सोबत फोटोसेशन केले. त्यांनाही आमचा अभिमान वाटत होता. तिथले सारे अनुभव साठवून सुमेद गावी पोहोचला. सातवी इयत्तेतील १३ वर्षाच्या सुमेदचे सारे अनुभव कथन फार बोलके व प्रेरणादायी होते.
अमेरिका प्रगत आहे. तिथे निसर्ग संपत्ती ही भरपूर आहे. दुपारचे कडकडीत ऊन असले तरी हवेत गारवा असतो. घामाघूम होणं हा प्रकारच नाही. झोपडपट्ट्या नजरेत पडल्या नाहीत. चकाचक रस्ते, हायफाय गाड्या हे सारं नजरेत भरणारं होतं. खाण्यासाठी पिझ्झा, बर्गर होताच. जेवणात तिखटपणा कमी पण गोडवा जास्त होता, असेही सुमेद गप्पा मारताना दिलखुलासपणे सांगत होता. हे सारं.. एवढं मोठं भाग्य मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाले,असे अभिमानाने आणि आत्मविश्वासपूर्ण नमूद केले. सुमेधला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्याच गावातील वाडीतील शिरवली बौध्दजन विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष विजय जाधव व सचिव सत्यविजय मांडकुलकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. सुमेधचे हे यश आम्हा गावकरी यांना अभिमानाची बाब असल्याचे सांगून पुढील शिक्षणाची सर्व जी मदत लागेल त्याला आमचे सहकार्य असल्याचे या पदाधिकारी यांनी सांगितले. विमान आणि अंतराळ यानाच्या विकासाशीसंबंधित एरोनॉटिकल अभियांत्रिकी आणि अंतराळ अभियांत्रिकीकडे सुमेध याचा कल आहे.