हवाई सुंदरी सोनाली जाधवने उंचावले रत्नागिरीसह महाराष्ट्राचे नाव!

- चेन्नईत पटकावला ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया २०२५’ किताब
रत्नागिरी : रत्नागिरीची सुकन्या सोनाली चंद्रकांत जाधव हिने २०१६ मध्ये हवाई सुंदरी होण्याचा मान प्राप्त केला. गेल्या सात वर्षांपासून यशस्वी गगनभरारी घेत तिने नुकत्याच एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये देखील सोनालीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताब पटकावत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सोनाली जाधव ही आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक सी ए. जाधव यांची सुकन्या आहे. सोनालीचे बारावी (सायन्स) पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीमध्ये झाले. पुढील शिक्षण मुंबई तसेच गोव्यामध्ये झाले. त्यानंतर दिल्ली येथून हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेऊन २०१६ मध्ये तिची चेन्नई विमानतळावर हवाई सुंदरी म्हणून एका कंपनीत आंतरराष्ट्रीय विमानसेवेकरिता निवड झाली. सोनाली २०१६ साली हवाई सुंदरी (एयर होस्टेस) बनली. विशेष म्हणजे सोनालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. सोनालीने जिद्द, चिकाटी आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या यशाच्या एक एक पायऱ्या सर करीत यशस्वी गगनभरारी घेतली. लहानपणी पाहिलेले स्वप्न सोनालीने खऱ्या आयुष्यात सत्यात उतरविण्यासाठी खूप परिश्रम घेतले. यावेळी तिच्या आई वडिलांचे तिला योग्य मार्गदर्शन लाभले.
सोनाली सध्या एयर होस्टेस लीडर पदावर कार्यरत आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या मिस मद्रासी इंडिया स्पर्धेत सोनाली जाधव हिने सहभाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत सोनालीने ‘मिस मद्रासी नॉर्थ इंडिया 2025’ किताब पटकावत मुकुट जिंकला आहे. या किताबाने रत्नागिरीसह महाराष्ट्राचे नाव उंचावले असल्याने सोनालीच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल तिचे चौहोबाजूंनी विशेष कौतुक केले जात आहे.