Konkan Railway | खेड स्थानकावर कोचुवेली एक्सप्रेस २२ पासून तर मंगला एक्सप्रेस २३ ऑगस्टपासून थांबणार!
- नवीन थांब्यांना रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर कोकण रेल्वे मार्गावर अंमलबजावणी
- संगमेश्वर स्थानकावर उद्या नेत्रावती एक्सप्रेसचे स्वागत
रत्नागिरी : रेल्वे बोर्डाने प्रायोगिक थांबा मंजूर केलेली नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वरला तर मंगला एक्सप्रेस खेड स्थानकावर उद्या दिनांक 22 ऑगस्टपासून थांबे घेणार आहे. कोकण रेल्वेने थांब्यांच्या अंमलबजावणीची अधिसूचना सोमवारीच जाहीर केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस 12617/18) तसेच एलटीटी- कोचुवेली (22113/14) एक्सप्रेस या दोन गाड्यांना रायगड तत्त्वावर थांबे मंजूर केले आहेत.
याचबरोबर संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी मागील काही वर्षांपासून संगमेश्वर चिपळूण फेसबुक समूहाचे संदेश जिमन यांनी वेळोवेळी आंदोलन करून रेल्वेचे लक्ष वेधून घेतले होते. रेल्वे बोर्डाने संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मंजूर केला आहे.
दोन्ही स्थानकांवर गाड्यांच्या स्वागताची तयारी
संगमेश्वरवासियांच्या दीर्घ लढ्याला यश येऊन नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर थांबा मिळाला आहे. या थांब्यावर ही गाडी 22 ऑगस्टपासून थांबणार आहे. त्यामुळे संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती तर खेड स्थानकावर मंगला एक्सप्रेसच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आली आहे. संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसचे स्वागत या गाडीला थांबा मिळण्यासाठी आंदोलने केलेल्या संदेश जिमन हे करणार आहेत.
२२ रोजी संगमेश्वरला डाउन नेत्रावतीच थांबेल ; अप नेत्रावती २३ पासून थांबा घेईल
२२ ऑगस्ट २०२३ आणि २४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवातीच्या स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या खेड आणि संगमेश्वर रोडला थांबतील. त्यानुसार दि. २२ ऑगस्ट २०२३ पासून १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस संगमेश्वर रोड येथे थांबेल तर २२११३ लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली सुपरफास्ट एक्सप्रेस खेड येथे थांबेल. २२ ऑगस्ट २०२३ ला सुटलेल्या १२६१७ एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन (दिल्ली) मंगला एक्सप्रेस आणि १२६१८ हजरत निजामुद्दीन (दिल्ली) एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस २३.०८.२०२३ पासून खेड येथे थांबतील. त्यानंतर २४.०८.२०२३ ला सुटणाऱ्या फेरीपासून २२११४ कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस २५.०८.२०२३ पासून खेडला थांबेल. १६३४६ तिरुअनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस २३.०८.२०२३ पासून संगमेश्वर रोड येथे थांबेल.