अजब-गजबमहाराष्ट्र

कोकणातील शुद्ध शाकाहारी ‘गवळीवाडी’

विविधतेने नटलेल्या भारतात प्रत्येक गावाची, वाडीची एक वेगळी ओळख असते. असंच रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील कांगवई गावांतील ‘गवळवाडी’ ही सुमारे १०० घरांची वस्ती! या वस्तीला हरिहर पांडे यांनी १८ जून रोजी भेट दिली. बराच वेळ थांबून स्थानिकांशी चर्चा केली, त्यातून पुढे आलेली माहिती…

कोकण किनारपट्टीवरील एखाद्या गावातील संपूर्ण वस्ती शाकाहारी असू शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही… पण रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील कांगवई  गावातील ‘गवळीवाडी’ संपूर्णपणे शाकाहारी आहे. कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास मांसाहारं! इथे प्रत्येकजण मांसाहार सेवन करणाराच असेल, अशी सर्वांची समजूत असू शकते. त्याला कारणही तसेच आहे. अलीबागखालील कोकणातील प्रत्येक गावात, रस्त्या-रस्त्यांवरील आणि चौका- चौकांतील रेस्टॉरेंट्सही त्याचीच निशाणी आहेत, पण मांसाहार खवय्यांच्या या मांदियाळीतही कांगवई गावांतील ‘गवळवाडी’ ही सुमारे १०० घरांची वस्ती पूर्णतः शाकाहारी आहे. या वस्तीने आपले ‘शुद्ध शाकाहारी’पण टिकवून ठेवले आहे.
मन प्रसन्न करणाऱ्या कोकण किनारपट्टीवरील निसर्गरम्य वनराई आणि डोंगररांगाच्या कुशीत वसलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील कांगवई गांव. हर्णे- आंजर्ले या समुद्रकिनाऱ्याहून १६ किमी, तर केळशी बिचवरून १९ किमी अंतरावर आहे. तिन ते चार हजार लोकवस्ती असलेली ‘गवळवाडी’ संपूर्णपणे शाकाहारी असणे बहुधा हे कोकणातील एकमेव उदाहरण असावं.
   या गावात मांसाहार किंवा मद्यपान केलेच जात नाही. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे, असं येथील वयोवृद्ध सांगतात. चांगल्या समाजासाठी मांस, मासे, दारु सोडणे आवश्यक असल्याचं त्याचं मत स्थानिकांचे आहे. या वस्तीत अनेक वर्षांपासून मांसाहार वर्ज्य आहे. त्यामुळे सुमारे ६०० मंडळींची संपूर्ण वस्ती शाकाहारी आहे. या वस्तीत मद्य आणि मांस यांचे दुकानसुद्धा नाही. येथील बहुतांश युवा मंडळी कामधंदा आणि नोकरीनिमित्त मुंबईला असूनसुद्धा आपला हा ‘शाकाहार मंत्र’ कटाक्षाने जपत आहेत. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींच्या सत्य, अहिंसा, मानवता, समानता या विचारांचा व महानुभाव तत्वज्ञानाचा पगडा या वस्तीला आहे.


येथील इतिहास सांगताना शांताराम महाडीक व रघुनाथ महागावकर म्हणतात, “गावातील गणपत भिकाजी महाडिक यांनी १९५९ साली महानुभाव पंथाचा उपदेश घेतल्यानंतर हा परिसर व्यसनापासून दूर राहावा, यावर भर दिला. त्यांनी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्रीगीतापाठशाळेचे संचालक बाळकृष्ण म्हस्के (म्हस्केभाऊ) यांच्या मार्गदर्शनात गांवकऱ्यांना जगण्याची योग्य दिशा दाखवली. गावातील प्रत्येकावर श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांचा प्रभाव पडला, तो अजूनही कायम आहे.” पुढे गणपत महाडिक (ई. श्री. गणोदा बिडकर), बाळकृष्ण म्हस्के (ई. श्री. बाळकृष्ण बिडकर) यांनी महानुभाव पंथाची दिक्षा घेतली. ई. श्री. बाळकृष्णदादांकडील शास्त्र अभ्यासाचा लाभ गावकऱ्यांनी घेतला. त्यांच्या प्रबोधनामुळे शंभर कुटुंबे असलेल्या गवळवाडीत नव्वद कुटुंबांनी महानुभाव पंथाचा उपदेश घेतला. गावात २५ मे १९७६ रोजी ‘महानुभाव श्रीकृष्ण ज्ञान मंदिरा’ची स्थापना झाली. ई. श्री. बाळकृष्णदादांच्या मार्गदर्शनात दरवर्षी दरवर्षी १३ व १४ मे रोजी मंदिराचा वार्षिकोत्सव राज्यभरातील संत- महंतांच्या उपस्थितीत ४७ वर्षापासून वर्धापनदिन साजरा केला जातो, पंचक्रोशित या सोहळ्याची चर्चा होते. मोठ्या आनंदात आणि उत्साहात महानुभावांचे परमेश्वरअवतार असलेले श्रीकृष्ण, श्रीदत्तात्रेय प्रभू, श्रीचक्रपाणी महाराज, श्री गोंविंदप्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी या पाचही अवतारांची जयंती गावात मोठ्या उत्साहात साजरी होते.
  बदलत्या काळात अनेक जण मांसाहार आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत असतानाच कांगवई गावामध्ये अठरापगड जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविध जाती-धर्मांतील लोक आपापल्या प्रथा-परंपरा पाळतातच; पण त्याचबरोबर शाकाहाराची परंपराही पाळत आहेत. भिन्न विचार अन् भिन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचे एकमत आहे. मासांहारापासून दूर राहून कोकणातही ‘संपूर्ण शाकाहारी वस्ती’ अशी ओळख गवळीवाडीने निर्माण केली आहे.


  श्रीचक्रधर स्वामींचे तत्वज्ञान, उपासनापद्धतीमुळे या वाडीने शाकाहाराचा मार्ग अंगिकारला. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य असल्यामुळे गावात भांडणं किंवा वादही होत नाहीत. येथील प्रत्येक व्यक्ती शाकाहारी आणि निर्व्यसनी असल्यामुळे गावातील रहिवाशांमध्ये आर्थिक, सामाजिक, मानसिक प्रगती झाली असल्याचे वाडीतील मंडळी अभिमानाने सांगतात.

गणपत महाडिक (ई. श्री. गणोदा बिडकर) यांनी लावलेल्या धर्मबिजरोपणाला पाणी घालण्याचं काम म्हस्केभाऊ (ई. श्री. बाळकृष्ण बिडकर) यांनी केलं. या दोघांनी लावलेल्या बिजाचं वृक्षात रूपांतर झाल्याचा लाभ आज कांगवई गाव घेत आहे, असे कृतज्ञतापूर्वक गावकरी सांगतात. आज सातारा येथील ‘महानुभाव मठा’च्या मार्गदर्शनात हा परिसर सप्त व्यसनापासून दूर आहे. तंटामुक्ती, दारुबंदी अशा योजना राबविणाऱ्या शासनाने गवळीवाडीचा आदर्श घेऊन एखादी योजना राबवावी, अशी अपेक्षा.

– हरिहर पांडे, नागपूर
मो. 9623802020

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button