महाराष्ट्र

चिपळूणचे पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘अक्षरमित्र’ पुरस्कार l


तळवडेतील आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात रविवारी होणार वितरण

तळवडे (राजापूर) : चिपळूणातील लेखक आणि पर्यटन, पर्यावरण, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर यांना राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने दिला जाणारा ‘अक्षरमित्र’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार संघाच्या आजपासून तळवडे (राजापूर) येथे सुरु होत असलेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी रविवारी (दिनांक १२) प्रदान करण्यात येणार असल्याचे संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार यांनी कळविले आहे.

पुस्तकांची विशेष दुकाने उपलब्ध नसलेल्या राजापूर-लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड जोपासता यावी यासाठी २०१५ पासून नियमित हे संमेलन भरवले जात आहे.

‘अक्षरमित्र’ पुरस्कार जाहीर झालेले धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांना लेखन आणि सामाजिक क्षेत्रातील सहभागाबद्दल भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने २००४ साली उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांनी दैनिकांकरिता ग्रामीण पत्रकारिताही केली आहे. त्यांनी विविध अभ्यासदौरे, निसर्ग, लेणी, पर्यटन अभ्यास, जंगलभ्रमण या करिता हिमाचल, कन्याकुमारी ते अंदमान आणि भूतान पर्यंतचा प्रवास केला आहे. याद्वारे जमा झालेला सुमारे २५ हजार डिजिटल फोटोंचा संग्रह त्यांच्याकडे आहे. पर्यटन, पर्यावरण संवर्धन, बिगरमौसमी जंगलपेर अभियान, वृक्ष लागवड, बीजपेरणी अभियान, चंदन लागवड अभियान, पर्यावरण जनजागृती, रमणीय निसर्ग छायाचित्रण, ग्रंथालय चळवळ कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. वाटेकर यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही पाच पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी या तीन चरित्र पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या ज्येष्ठ कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्यावरील पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. विविध विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक आदि सुमारे २५हून अधिक संग्राह्य अंक आणि पुस्तिकांचे संपादनही त्यांनी केले आहे. त्यात कोकणातून गेली दीडशे वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक सत्यशोधकच्या सुमारे ४६० पानांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचा समावेश आहे.

वाटेकर यांनी संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन (१२ हजार प्रतींचे वितरण) केले आहे. ते राज्यभरातील विविध नियतकालिकातून गेली २५ वर्षे सातत्याने लेखन करत आहेत. त्यांना यापूर्वी कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाचा नलगे ग्रंथ पुरस्कार, ‘पर्यावरण भूषण’, ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे, ‘पद्मश्री’ राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात गौरव, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या ‘तेर पॉलिसी सेंटर’चा ‘प्रकाशाचे बेट’ पुरस्कार, अस्तित्व पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button