दप्तरवीना शाळा उपक्रमात शिवने शाळेची मुले रमली पैसा फंडच्या कलादालनात!
- ९ फुट उंचीची पेंसिल पाहून मुले भारावली
- डिजिटल कलाशिक्षणाची माहिती
संगमेश्वर दि. १२ : एक दिवस दप्तरावीना शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा शिवनेचे विद्यार्थी संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कलादालनाला भेट देण्यासाठी आज आले होते . जवळपास अडीचतास हा बालचमू चित्र आणि शिल्पांच्या दुनियेत मस्त रममाण झाला.
शिवने प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा करंजळकर , सहयोग सेविका निलांबरी मांडवकर , व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल पवार , अंगणवाडी सेविका स्नेहा चव्हाण , पालक आणि विद्यार्थ्यांनी पैसा फंड कलादालनात प्रवेश करताच सर्वांचे कलाविभागातर्फे स्वागत करण्यात आले . कलावर्गाजवळ ९ फूट उंचीची पेंसिल आणि थ्रीडी चित्र का तयार करण्यात आले , याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. कलादालनात प्रवेश करताच सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि पालक चित्र आणि शिल्प पाहून अक्षरशः भारावून गेले. यावेळी चित्रांचे – शिल्पांचे प्रकार आणि त्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली .
कलावर्गातील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे आणि कलासाधना या गेली २३ वर्षे विनाखंड सुरु असणाऱ्या उपक्रमातील चित्रे पाहून आम्ही देखील आता नव्या जोमाने चित्रे काढण्याचा नक्की प्रयत्न करु असे विद्यार्थ्यांनी नमूद केले . डिजिटल कलाशिक्षण म्हणजे काय, याबाबत माहिती देवून विद्यार्थ्यांना एक प्रात्यक्षिक आणि एक बोधकथा स्क्रीनवर दाखविण्यात आली . सर्व विद्यार्थ्यांना कलाविभागाच्यावतीने बिस्किट पूडा देण्यात आला. शिवने शाळेच्या विद्यार्थ्यांना कलादालन पाहण्याची संधी दिल्याबद्दल शिवने शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा करंजळकर , व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल पवार यांनी व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये , पैसा फंडचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि पैसा फंडच्या कलाविभागाला धन्यवाद दिले . शिवने शाळेचे विद्यार्थी पैसा फंड कलादालन आणि कलावर्ग पाहिल्यानंतर नव्या जोमाने आणि उत्साहाने चित्र रेखाटणार असल्याने आजचा दप्तरवीना शाळा हा शिवने शाळेचा उपक्रम यशस्वी झाल्याचे व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी यावेळी नमूद केले.