निसर्गाच्या संवर्धनासाठी सृष्टी वृक्ष बँकेची स्थापना
उरणमध्ये फ्रेंड्स ऑफ नेचरचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे) : दिवसेंदिवस पर्यावरणाचा -हास मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे पर्यावरणाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पर्यावरणाचे, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन, करण्याच्या दृष्टीकोनातून उरण तालुक्यातील फ्रेडस ऑफ नेचर या पर्यावरणप्रेमी निसर्गप्रेमी संस्थेने आजपर्यंत अनेक विविध उपक्रम निरपेक्ष भावनेने राबविले आहेत. पर्यावरणाचा -हास लक्षात घेऊन वृक्षलागवडीसाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून वसुंधरा दिनी अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)ची रोपवाटीका- सृष्टी वृक्ष बँकेची स्थापना करण्यात आली आहे.
फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन),सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था,चिरनेर, उरण,रायगड संस्थेतील नवनिर्वाचीत सदस्य म्हणून कार्यरत असलेले,फॉन संस्थेच्या कार्यात आधीपासूनच आपले योगदान देणारे निसर्गमित्र बाळकृष्ण मोकल यांनी वृक्ष लागवडीचे नियोजन वसुंधरा दिन व अक्षय तृतीये च्या मुहूर्तावर करायचे आहे असे सुचविले होते .त्या निमित्ताने फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर यांच्या संस्थेसाठी असणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रकल्प फ्रेंड्स ऑफ नेचर रोपवाटिका (नर्सरी) चा शुभारंभ या वसुंधरा दिनी व अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर फ्रेंड्स ऑफ नेचरच्या सभासदांनी केला आहे. या कार्यक्रमासाठी लाल माती हवी होती.
संस्थेचे माजी अध्यक्ष राजेश नामदेव पाटील व मनीषा राजेश पाटील यांनी माती आणून दिली.व फ्रेंड्स ऑफ नेचर रोपवाटिका नर्सरीला म्हणजेच सृष्टी वृक्ष बँकेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.धावपळीच्या काळात अनेकांना आपली वृक्षारोपणाची आवड वेळेअभावी अथवा जागे अभावी जोपासता येत नाही पण ती रोपे किंवा झाडे वाढवून मोठी करण्यासाठी सृष्टी वृक्ष बँक ही संकल्पना फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेमार्फत सुरु करण्यात आली.
सृष्टी वृक्ष बँक मध्ये नागरिकांना आपल्या अथवा आपल्या प्रियजनांच्या नावे देशी फळांच्या, वृक्षांच्या बिया,रोपे,झाडे डिपॉजीट करता येतील.आम्ही त्या झाडांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना मोठं करून ती वनपरिक्षेत्रात लावू. अनेक वेळेस आम्ही लावलेली झाडे असामाजिक घटकांनी उध्वस्त केलीत आणि वणव्यांच्या भक्ष्यस्थानी ही गेलीत पण या सृष्टी वृक्ष बँक प्रकल्पाद्वारे आम्ही ह्या सर्व अडचणी लक्षात घेता त्या सर्व अडचणींवर पर्याय म्हणून आम्ही ती सर्व झाडे योग्य ती काळजी घेऊन त्यांचं वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण करू! आपणही या प्रकल्पात सहभागी होऊन श्रमदान करू शकता.असे आवाहन फेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी केले आहे.
ज्यांना या निसर्ग संरक्षण मोहिमेत वृक्ष लागवड करून सहभागी व्हायचे आहे. त्यांनी फ्रेंड्स ऑफ नेचरचे पदाधिकारी जयवंत ठाकूर( 9594969747 ),शेखर म्हात्रे (9821790831),कु.निकेतन ठाकूर( 97731 98528),बाळकृष्ण मोकल(9221049908) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन निसर्ग प्रेमी, पर्यावरण प्रेमींना करण्यात आले आहे.