महाराष्ट्र

पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकरांचा आदर्श जपावा

कोकण ही नररत्नांची खाण आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या विभूती या लाल मातीत जन्मल्या. त्यात आचार्य विनोबा भावे, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर, अर्थतज्ञ डॉ. सी.डी देशमुख, म.म.दत्तो वामन पोतदार, महर्षी धोंडो केशव कर्वे, स्वाध्यायकार पांडुरंगशास्त्री आठवले, थोर निरुपणकार डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी इत्यादींचा समावेश होतो.

बाळशास्त्री जांभेकर त्या विभूतींपैकी एक आहेत. प्रकांड बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती, वाचनाची आवड, विविध भाषांवर कमांड, कमालीची जिद्द व ध्येय निश्चितीने झपाटलेल्या जांभेकरांची पेंभुर्ले (जि.सिंधुदूर्ग ) ही जन्मभूमी. त्यांचे इ.चौथी पर्यंत शिक्षण मायभूमीत झाले. पेंभुर्ले हे गाव मराठी भाषिक पत्रकारांचे तीर्थक्षेत्र आहे. दि.6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारितेत उत्कृष्ठ काम करणाऱ्या पत्रकारांना बाळशास्त्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ दर्पण पुरस्काराने सन्मानित केले जाते. या गावी बाळशास्त्रींचे राष्ट्रीय स्मारक उभारले असून दरवर्षी तेथे पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजिला जातो.


बाळशास्त्री जांभेकरांची अफाट बुध्दीमत्ता व तीव्र स्मरणशक्ती पाहून या हिऱ्याला कोंदण पाडण्यास संस्कृततज्ञ बापू छत्रे यांच्याकडे इंग्रजी व संस्कृत शिकण्यासाठी पाठविले. तसेच नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी शाळेत दाखल करून अवघ्या 5 वर्षांमध्ये तेथील अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी इंग्रजी, संस्कृत व अन्य भाषांवर प्रभुत्व गाजविले. मुंबईत आल्यानंतर बाळशास्त्रींच्या ज्ञानाला धुमारे फुटले. येथे त्यांना प्रखर बुद्धीमतेचे मित्र भेटले. सखोल वाचनासाठी एशियाटिक लायब्ररी सारखे मोठे ग्रंथालय मिळाले. देशभक्त दादाभाई नौरोजी व केरुनाना छत्रे यांची संगत सोबत लाभली. शैक्षणिक प्रयोग करण्यास त्यांना मोठे व्यासपीठ मिळाले. प्रा.अर्लिबार यांच्या मार्गदर्शनामुळे गणित व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. अनेक जागतिक भाषा आत्मसात करता आल्या. प्रखर बुद्धी, अफाट वाचन व पराकोटीची जिद्द असल्यामुळे अवघ्या 34 वर्षांच्या आयुर्मानात त्यांनी अनेक जागतिक विक्रम केले. एल्फिस्टन हायस्कूलमध्ये शिक्षक, प्रा.हार्बर यांनी स्थापन केलेल्या ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्यपद भूषविले. शासकीय नॉर्मल स्कूलचे अध्यक्षही झाले. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या कार्यात भाग घेणारे ते पहिले भारतीय विद्वान ठरले.
शिक्षणतज्ञ बाळशास्री असा नामोल्लेख करण्याजोगी त्यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी आहे. विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन सहजगत्या होण्याजोगी पुस्तके त्यांनी तयार केली. त्यात नीतिकथा, सारसंग्रह, भूगोल, इतिहास, गणित, व्याकरण इ. चा समावेश आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रथमच मुद्रित स्वरुपात वाचकांच्या हाती त्यांनी दिला. बाटवून ख्रिश्चन झालेल्या श्रीपाद शेषाद्रीला शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले. तसेच सर्वत्र शुद्धीकरण चळवळ राबवली. त्यांनी सतीची चाल, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, मुलींची विक्री तसेच अंधश्रद्धेस विरोध करून ते पहिले समाजसुधारक बनले. त्या काळात मराठी भाषिक वर्तमानपत्र नव्हते. ही उणीव दूर होण्यासाठी दर्पण नावाचे साप्ताहिक सुरू केले. काही महिन्यांनी इंग्रजी भाषेतही ते काढले. एवढेच नव्हे तर सर्व विषयांचा सार असलेले दिग्दर्शन हे मासिक चालू करून मराठी भाषेत वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. म्हणून पोंभुर्ले हे गाव मराठी भाषिक पत्रकारांची पंढरी बनली. शिवाय दि.6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन साजरा होऊ लागला. समाजहितैषी लेखणी चालविणाऱ्या पत्रकारांना दर्पण पुरस्काराने सन्मानित केले जाते. बाळशास्त्रीजींची मराठी प्रमाणेच संस्कृत, बंगाली, गुजराथी, कानडी, तेलगू, फारशी, फ्रेंच,लॅटिन व ग्रीक भाषांवर मदार होती म्हणून त्यांना पहिले बहुभाषिकोविद म्हणत.
त्यांच्यात सखोल पांडित्य व अध्यापनपटूत्व होते. ते गणित व ज्योतिष शास्त्रात पारंगत होते. म्हणून कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. गणित, वाड्मय व विज्ञान या विषयांचे पहिले एतद्देशीय लेक्चरर म्हणून नियुक्ती. शाळा खात्याकडून पहिले नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून नियुक्ती.प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून तसेच इतिहासाबाबत पुरावे गोळा करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट याबाबत शोधनिबंध लिहिले आणि इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक बनले. आद्य समाजसुधारक, वृत्तपत्रकार, निबंधकार, भाषांतरकार, इतिहास संशोधक, व्याकरणकार, शिक्षणतज्ञ असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले बाळशास्त्री वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी जग सोडून गेले.
वृत्तपत्रसृष्टीत रायगडचा वरचष्मा–
बाळशास्त्रींचा आदर्श रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी गिरविल्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत या जिल्ह्याचा वरचष्मा टिकून राहिला. अलिबागचे तरूण केशव रावजी आठवले यांनी 1870 साली सत्यवदन हे साप्ताहिक चालू करून जिल्ह्यात वृत्तपत्राचा पाया घातला. लगेचच मुरुड येथे सिंधुयुग्म सुरू झाले. अलिबाग येथे मेडिएटर पाक्षिक तसेच सद्धर्म दीप व अबला मित्र चालू झाले पेण येथे नारायण गणेश मंडलिक यांनी सुधाकर चालविले. माथेरान येथे फ्रामजी मेहता यांनी माथेरान जार्डिंग्ज चालू केले. तसेच पेण येथून पेण समाचार, महाड येथून ब्रह्मोदय वैजनाथ (ता.कर्जत) येथून कुलाबा साप्ताहिक सुरू झाले पण कालौघात ती बंद पडली. देशभक्त रामभाऊ मंडलिक यांनी पारतंत्र्य काळात सुरू केलेले कुलाबा समाचार, स्वातंत्र्य, काळातही चालू ठेवले. पण दुर्दैवाने शतक गाठण्यापूर्वीच बंद पडले. बहुजन समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली पेझारी येथून 1937 साली चालू केलेले कोकण कृषीवल चे दैनिकात रुपांतर होऊन कृषीवल या नावाने प्रसिद्ध होत असून ते कोकणात प्रथम दर्जाचे दैनिक ठरले आहे. पारतंत्र्य काळात अलिबाग येथून राष्ट्रतेज साप्ताहिक चालू झाले. पण तेही स्वातंत्र्य काळात बंद पडले. अनेक पत्रकार घडले. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अनेक भाषा, अनैक धर्म, अनेक पंथ असलेल्या भारतातील शेवटल्या घटकातील माणसाला विकासाचा किरण गवसण्यासाठी या देशात लोकशाही राज्यपद्धती चालू झाली. स्वातंत्र्याबरोबरच विचार स्वागत, प्रचार स्वातंत्र्य मुद्रण स्वातंत्र्यही मिळाले. लोकशाहीचा 4 था स्तंभ अधिक बळकट होण्यासाठी वृत्तपत्रांना शासकीय जाहिरातीशिवाय पत्रकारांना अधिस्वीकृतीपत्रिका देऊन शासकीय योजनांचा लाभ देऊ केला. जिल्ह्यात अनेक वृत्तपत्रे सुरू झाली. पत्रकारही घडले. त्यात साप्ताहिक निर्धार, प्रज्ञा, कुलाबा मानस, शंखनाद आदर्श, कुलाबा दर्पण, कुलाबा वैभव, रायगडचा युवक, कोकणनामा (अलिबाग) किल्ले रायगड, दै.निर्भीड लेख, विद्या (पनवेल), वादळवारा (उरण), दक्षिण युग (गोरेगाव), कुलाबा शिवतेज (महाड), झुंझार शिक्षक (पेण), एकात्मता (महाड), कोकणकडा (गोरेगाव), रायगडचा आवाज, महाड- पोलादपूर टाईम्स, रसायनी टाईम्स, पनवेल टाईस,उरण टाईम्स, जनमत, किनारा, श्रीवर्धन टाईम्स इ. अनेक वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली.


या जिल्ह्याने दिग्गज पत्रकार निर्माण केले आहेत. त्यात माजी आमदार नारायण नागू पाटील व रामभाऊ मंडलिक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, लोकसत्ताचे संपादक त्र्य.वि.पर्वते, लोकमत संपादक मधुकर भावे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पत्रकार अनेकांना प्रसिद्धीच्या झोतात आणतात, पण प्रसिद्धी देणारे पत्रकार मात्र प्रसिद्धीपासून वंचित राहतात. समाजात विधायक कामे करणाऱ्या पत्रकारांचा यथोचित सन्मान होण्यासाठी रायगड पत्रभूषण पुरस्काराने रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ हा निवडक पत्रकारांचा वर्धापनदिनी सन्मान करते. सन्मान चिन्ह, मानपत्र, रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असते. या पुरस्काराचे मानकरी विसूभाऊ मंडलिक, नारायण मेकडे, मधुकर कुळकर्णी, राजाभाऊ देसाई , ल.पां.वालेकर, र. हेंद्रे., द.क्रु वैरागी, रा.पि. दोशी, म.ना.पाटील, मधुकर हातकमकर, शशिकांत गडकरी, नवीनचंद्र सोष्टे, दिलीप राजे, बळवंत वालेकर, माधवराव भावे, माधव पाटील, दामोदर शहासने, अरुण करंबे, मदन हणमंते, आनंद जोशी इ. पत्रकार सन्मानित झाले आहेत.
म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांप्रमाणे अभ्यासू , चोख़ंदळ व जनमानसाची नाडी जाणणारे पत्रकार निर्माण व्हावेत, हीच पत्रकारदिनी अपेक्षा !

लेखक :
श्री.बळवंत वालेकर
संपादक, साप्ताहिक कुलाबा वैभव
तथा ज्येष्ठ पत्रकार, अलिबाग (रायगड )

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button