महाराष्ट्र

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक

कृषी विभागांतर्गत विविध पिकांचे क्षेत्र, उत्पादकता व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सद्य:स्थितीमध्ये पिकांची उत्पादकता जवळपास स्थिरावली असल्याचे दिसून येते. याचबरोबर बाजारातील मागणी आणि त्याचा पुरवठा याचे प्रमाण बऱ्याचवेळा विषम असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेऊनही मागणी अभावी त्यांचा माल कमी किंमतीला विकला जातो. बऱ्याच वेळेस फळपिके व भाजीपाला पिकांसारखा नाशवंत शेतीमाल विक्री अभावी वाया जात असल्याने शेतकऱ्यांना बऱ्याचवेळा मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
याचबरोबर वाढत्या शहरीकरणामुळे धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जन प्रक्रियायुक्त व तयार शेती उत्पादनांचा वापर करत आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रियायुक्त पदार्थांच्या वाढलेल्या मागणीचा विचार करुन केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेस मान्यता दिली आहे. असंघटीत अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक अडचणी/समस्या आहेत. जसे संबंधित उद्योजक बाहेरुन कर्ज घेण्यास पात्र होत नाहीत, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च, आधुनिकीकरणाचा अभाव, एकात्मिक अन्न प्रक्रिया साखळीचा अभाव आणि अन्न व सुरक्षितता मानांकनांचा अभाव या समस्यांचे निराकरण या योजनेंतर्गत करण्यात येत आहे.


केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र पुरस्कृत योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबविली जात आहे.
या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट अथवा त्यांचे फेडरेशन, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा ई. यांना सामाईक पायाभूत सुविधांच्या/मूल्य साखळीच्या निर्मितीसाठी सहाय्य केले जाणार आहे. योजनेंतर्गत निर्मित सामाईक पायाभूत सुविधाचा वापर इतर अन्न प्रक्रिया प्रकल्पांना व संबंधितांना देखील सुविधांच्या क्षमतेच्या भरीव प्रमाणात होण्याकरिता या सुविधा भाडे तत्वावर उपलब्ध असाव्यात. अशा प्रकल्पांची सहाय्यासाठी पात्रता ठरवित असतांना शेतकऱ्यांना व उद्योग क्षेत्रास मिळणारा लाभ, व्यवहार्यता फरक (व्हायेबलिटी गॅप), खाजगी गुंतवणूकीची अनुपलब्धता, मुल्यसाखळीची गरज इ. बाबींचा विचार करुन निर्णय घेतला जाईल.


या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा, (Common Infrastructure) / मूल्य साखळी (Value chain) या घटकातंर्गत बँक कर्जाशी निगडीत ग्राह्य प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के कमाल रु.03 कोटी पर्यंत अर्थसहाय्य देय आहे. तसेच पात्र संस्थांसाठी किमान अनुभव व आर्थिक उलाढाल याची अट नाही. तथापी प्रकल्पासाठी बँकेची कर्ज पूर्व सहमती (In principal approval) आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत सहाय्यासाठीच्या सामाईक पायाभूत सुविधा प्रकार :
• कृषि उत्पादनाची वर्गवारी, प्रतवारी, साठवणूक करण्यासाठी जागा व इमारत तसेच शेतीक्षेत्राच्या (Farm gate) जवळ शीतगृहाची उभारणी.
• एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार निश्चित केलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी सामाईक प्रक्रिया सुविधा.
 कार्यपध्दती :
योजनेंतर्गत या प्रकारच्या प्रस्तावांना निधी प्राप्त होण्यासाठी खालील कार्यपध्दतीचा अवलंब केला जाईल.
 योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक व सामाईक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी निधी मागणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) हा विहीत नमुन्यात तयार केलेला असावा.
 सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये प्रकल्प खर्चाचा सविस्तर तपशील, आवश्यक मनुष्यबळ, आर्थिक उलाढाल, विपणन व्यवस्था, कच्च्या मालाची उपलब्धता, अंदाजित नफा-तोटा पत्रक, जमा-खर्चाच्या रोखीच्या प्रवाहाचे पत्रक इ. चा समावेश असणे आवश्यक.
 अर्जदार संस्थेचे योगदान प्रकल्प खर्चाच्या किमान 10% असणे आवश्यक आहे. पोर्टलवर अर्ज करण्यापूर्वी, अर्जदार संस्थेने प्रकल्पासाठी कर्ज देणाऱ्या बँकेकडून तत्त्वत: मान्यता / पूर्व संमती सादर करणे आवश्यक आहे.
 केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल,अनिवार्य कागदपत्रे,प्रकल्प छायाचित्रे, दरपत्रके व बँक पूर्व संमती इ. सह परिपूर्ण अर्ज ऑनलाईन सादर करावा. सदर प्रस्ताव DRP/SNA द्वारे प्राथमिक छाननी होऊन राज्य कार्यकारी समिती / राज्यस्तरीय मंजूरी समितीने मंजूरी दिल्यानंतर राज्यस्तरीय नोडल यंत्रणा (SNA) सदरच्या प्रस्तावाची शिफारस Online Portal द्वारे संबधित वित्तीय संस्थेस कर्ज मंजूरीसाठी करेल.
 वित्तीय संस्थेने कर्ज मंजूर केल्यानंतरच सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी लाभार्थी संस्थेस झालेला खर्च प्रति प्रकल्प जास्तीत जास्त रु. 50 हजार दिला जाईल. अर्जदार संस्था सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा अनुभव असलेल्या कोणत्याही व्यावसायिक संस्थेची मदत घेऊ शकते.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ( PMFME) योजनेंतर्गत सामाईक पायाभूत सुविधां/मुल्य साखळी चा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
यासाठी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयांशी तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती अर्थात DRP यांचेशी संपर्क करावा. www.mofpi.gov.in या केंद्र सरकारच्या किंवा www.krishi.maharashtra.gov.in या राज्य सरकारच्या वेबसाइटवरूनही या योजनेची सर्व माहिती मिळू शकते.
अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

-मनोज शिवाजी सानप,

जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button