मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या कार्याचा राज्यस्तरावर सन्मान!
खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या कार्याचे केले विशेष कौतुक
रत्नागिरी : जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. विविध उपक्रम, संघर्षमय पत्रकारिता इत्यादी घटक सदरचा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी कारणीभूत ठरले. परिषदेने आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार प्राप्त केल्याने विविध स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामनाचे कार्यकारी संपादक, ज्येष्ठ पत्रकार खासदार संजय राऊत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या रंगा आण्णा वैद्य राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेला जाहीर करण्यात आला होता. त्याचे वितरण कर्जत येथे शुक्रवारी खा. संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने कोरोना काळात, चिपळूणमध्ये महापुरावेळी केलेली मदत तसेच पत्रकारांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी केलेली आंदोलने व प्रामुख्याने शशिकांत वारिसे हत्या प्रकरणात केलेला पाठपुरावा व कुटुंबाला मिळवून दिलेली मदत या सर्व कामांची दखल घेत मराठी पत्रकार परिषदेने यंदाचा रंगा आण्णा वैद्य राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची निवड करण्यात आली होती.
हा पुरस्कार दि.७ एप्रिलला कर्जत जामखेड येथे मराठी पत्रकार परिषदेने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा या कार्यक्रमात दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्विकारला. राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, कोकण संघटक हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, प्रसिद्धी प्रमुख जमिर खलफे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
कार्यक्रमावेळी व्यासपीठावर आमदार रोहित पवार, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.