मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक ६ तासांनी सुरळीत
चिपळूण : अवकाळी पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरानजीकच्या परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सकाळी दहा वाजता एकेरी सुरू करण्यात यश आले. त्याआधी घाटात अनेक वाहने अडकून पडली होती. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने सहा तासांच्या प्रयत्नानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात यश मिळवले.
सोमवारी रात्री तसेच मंगळवारी पहाटेच्या सुमारास चिपळूण परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण -खेडला जोडणाऱ्या परशुराम घाटात रस्त्यावर माती आल्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. मंगळवारी पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लोटे चिरणी मार्गे कळंबस्ते- चिपळूण अशी वळवण्यात आली होती. दिनांक 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीत परशुराम घाटातील वाहतूक ही महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गतीने पुढे नेण्यासाठी दुपारी बारा ते पाच या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक घेऊन केले जात आहे. या व्यतिरिक्त वेळेत घाटातून वाहतूक सुरू ठेवली जाते. अशी वाहतूक सुरू असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसामुळे रस्त्यावर माती आल्यामुळे परशुराम घाट वाहतुकीसाठी ठप्प पडला होता. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घाटातील अडथळा दूर केल्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले. तोपर्यंत घाटात अडकून पडलेल्या अनेक वाहनांमधील प्रवाशांचा प्रचंड खळंबा झाला.