रत्नागिरी-चिपळूण मार्गावर चालवली ‘एसी’ बंद असलेली शिवशाही बस!
आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे घुसमटत, गुदमरत प्रवाशांनी केला नाईलाजाने प्रवास!
रत्नागिरी : राज्य शासनाने अलीकडेच सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे एकीकडे महिला प्रवाशांचा एसटी बसेसकडे ओघ वाढत असतानाच एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शुक्रवारी रत्नागिरी ते चिपळूण असा वातानुकूलित शिवशाही बसमधून प्रवास केलेल्या प्रवाशांना आला. तापमान वाढीमुळे आधीच प्रचंड उकाडा.. त्यातच एसी चालू नसलेली शिवशाही बस, तिच्या खिडक्याही न उघडता आल्यामुळे रत्नागिरी ते चिपळूण या 90 किलोमीटरच्या मार्गावरील प्रवाशांना शुक्रवारी शिवशाही बस मधून घुसमटत आणि खिडक्या बंद असल्यामुळे गुदमरतच प्रवास करावा लागला.
या संदर्भात प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस चिपळूण ते रत्नागिरी मार्गावरील एसटीच्या नियमित बसेसचे वेळापत्रक बिघडलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार चिपळूण ते रत्नागिरी या मार्गावरील बसेस या चिपळूण आगाराकडून चालवल्या जातात. मात्र, गेले काही दिवस आठवड्यातील अनेक दिवस या मार्गावरील बसेस वेळेत सुटत नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. शुक्रवारी तर प्रवाशांनी कहरच अनुभवला.
शुक्रवारी रत्नागिरी ते चिपळूण या मार्गावर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एसटी बस निघून गेल्यानंतर तब्बल तीन तासाने खेडसाठी एक एसटी बस सोडण्यात आली. मात्र ती सुटलेल्या राहटाघर आगारातूनच त्यामधून प्रवासी हे दरवाजापर्यंत उभे राहून आल्यामुळे जिल्हा परिषद, माळनाका, मारुती मंदिर अशा जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या प्रमुख थांब्यावरील प्रवाशांना न घेता ही बस चिपळूण -खेडच्या दिशेने रवाना झाली. आधीच तीन तास बस नाही त्यात एक आली तीही खचाखच भरलेली. यामुळे एसटी बसची प्रतीक्षा करत उभे असलेलले प्रवासी संतप्त झाले.हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला.
रत्नागिरी ते चिपळूण या मार्गावर शुक्रवारी प्रवास केलेल्या अनेक प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी पावणेचार वाजता चिपळूणसाठी शिवशाही बस सोडण्यात आली. शिवशाही बस वातानुकुलीत असल्यामुळे बसला भाडे तसेच आकारण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात बसमधील वातानुकूलन यंत्रणा बंदच असल्याचे लक्षात आले. मात्र तरीही आधीच तासन तास वाट पाहून कंटाळलेल्या प्रवाशांनी नाईलाज म्हणून बसमध्ये बसणे पसंत केले. तापमान वाढीमुळे आधीच उकाडा…त्यात वातानुकलीत बसमधील एसी बंद खिडक्या उघडता येत नाहीत, अशा परिस्थितीत शिवशाही बसमध्ये बसलेल्या संगमेश्वर, तुरळ, आरवली, सावर्डे मार्गावरील प्रवाशांना घुसमटतच या बसमधून प्रवास करावा लागला. या दरम्यान बसमधील लहान मुलांना त्रास झाल्याने त्यांनी रडून ओरडून पुढील प्रवास कसाबसा केला. शुक्रवारी रत्नागिरी ते चिपळूण मार्गावर प्रवास केलेल्या प्रवाशांनी या संदर्भात एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
एकीकडे राज्य शासनाने अलीकडेच महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर महिला प्रवाशांची पावले पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर एसटीकडे वळू लागली असतानाच असं गैर नियोजन करून अधिकारीच खासगी प्रवासी वाहतुकीकडे प्रवाशांनी वळावे यासाठी घाट घालत नाहीत ना, अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.