रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीचा संगमेश्वरसाठीचा राखीव डबा पूर्ववत करावा
संगमेश्वरवासीयांच्या वतीने कोकण रेल्वेला पत्र
संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गवरील संगमेश्वर रोड हे महत्त्वाचे स्थानक असून रोज धावणारी रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीला संगमेश्वर रोड स्थानकामध्ये संगमेश्वरवासियांकरिता पूर्वी असलेला डबा पूर्ववत करण्याची मागणी संदर्भात पत्र निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने कोकण रेल्वे ला देण्यात आले आहे.
कोकण रेल्वेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षी संगमेश्वर रोड स्थानकातून कोकण रेल्वेला चांगले उत्पन्न मिळते. या वर्षीच्या तिकीट विक्रीतून 4 कोटी 93 लाख 71 हजार 457 एवढे उत्पन्न मिळाले. असे असूनही संगमेश्वरवासीयांना असुविधेशी सामना करावा लागत आहे. निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या वतीने गेली चार वर्षे नेत्रावती-मत्स्यगंधा रेल्वे संगमेश्वर रोड स्थानकात थांबा संदर्भातील आंदोलन सुरूच आहे. मात्र विविध मार्गाने आजपर्यंत सरकारी पातळीवर प्रयत्न चालू आहेत.
या मार्गावरील गाडी क्र. 50104 रत्नागिरी-दिवा पॅसेंजर या गाडीला पूर्वीपासून असलेला राखीव डबा संगमेश्वर रोड प्रवासी वर्गासाठी पूर्ववत करावा, अशी संगमेश्वर रोडवासीयांची मागणी आहे. सध्या संगमेश्वर रोडवासीयांसाठी एक्स्प्रेस गाड्या चार आणि एक पॅसेंजर. या गाड्यांचं आरक्षण कायमच फुल असते. यावरून या स्थानकाला किती महत्त्व आहे हे कोकण रेल्वेने लक्षात घ्यावे, असे फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी म्हटले आहे.