राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३७वा वर्धापन दिन ७ फेब्रुवारी रोजी
रत्नागिरी शाखेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार गौरव
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३७ वा वर्धापन दिन येत्या मंगळवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असेल. अधिकारी कल्याण केंद्र निधी संकलनाच्या केलेल्या उत्तम कार्याबद्दल रत्नागिरी शाखेचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
महासंघाच्या रत्नागिरी शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. विकास सूर्यवंशी कोषाध्यक्ष आता कोषागार अधिकारी महाशिव वाघमारे आणि उपाध्यक्ष तथा रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी ही माहिती दिली.
मुंबई येथे परिषद सभागृह मंत्रालय सहावा मजला येथे हा सोहळा होणार असून या कार्यक्रमास मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या राजपत्री अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा महासंघाने सातत्याने केला असून त्याला वेळोवेळी यश प्राप्त झाले आहे.
महासंघाच्या पाठपुराव्याने बक्षी समितीचा खंड -2 अहवाल स्वीकृत होण्यासोबतच सोबतच अपघात विमा राशीत वाढ,केंद्र प्रमाणे महागाई भत्ता आधी मागण्यांना शासनाने मान्यता दिली आहे.
महासंघ तर्फे कार्यसंस्कृती अभियान राबविण्यात येत आहे. सोबतच अधिकाऱ्यांसाठीचे बहुद्देशीय कल्याण केंद्र उभारणीचे काम सुरू आहे या कामात रत्नागिरी शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली यात डॉ. विकास सूर्यवंशी सुशांत खांडेकर तसेच इतर अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे असे जाहीर एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.