राज्यस्तरीय शिक्षण परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत
पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासह ना. केसरकर यांचीही उपस्थिती
प्राथमिक शिक्षक संघाच्या शिक्षण परिषद उपस्थिती ; ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकरही उपस्थित राहणार
रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दि. १७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. प्राथमिक शिक्षक संघाच्या शहरातील चंपक मैदान येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी येथील चंपक मैदानावर दुपारी प्राथमिक शिक्षक संघातर्फे शिक्षण परिषद तसेच शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित राहणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी मुंबई विमानतळावरून रत्नागिरीला येण्यासाठी निघणार आहेत. सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी त्यांचे रत्नागिरी विमानतळावर आगमन होईल. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहेत. तर पालकमंत्री उदय सामंत हे मुंबईवरून मुख्यमंत्र्यांसमवेत विमानाने रत्नागिरी विमानतळावर येणार आहेत. तिथून दुपारी बारा वाजता चंपक मैदानामध्ये होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय मेळाव्याला ते उपस्थिती दर्शवतील.
चंपक मैदानातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचा इतर मान्यवर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेले नव्या गाड्यांचे लोकार्पण करणार असून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला देखील मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार आहेत.
रत्नागिरीतील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री सायंकाळी चार वाजता भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी विमानतळावरून विमानाने मुंबईला जाण्यासाठी रवाना होणार आहेत.