राज्यस्तरीय समूहगायन स्पर्धेत पोफळी प्रशालेचे घवघवीत यश
स्पर्धेत सुमारे दीडशे शाळांचा सहभाग
चिपळूण : ज्ञान प्रबोधिनी पुणेची भगिनी संस्था असलेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी पुणे यांच्यामार्फत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागाने समुहगायन, प्रशालेतील अध्यापक व सहकारी कर्मचारी यांचेसाठी समूहगायन, समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक १० सांगीतिक रागामध्ये सादर करणे, सूर्यनमस्कार,श्रमदान अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्या मध्ये विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,कोकण आणि पुणे अशा विभागांमधील जवळपास १५० शाळा सहभागी झाल्या होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी प्रशालेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
मातृमंदिर विश्वस्त सस्थे मार्फत श्री.नितीनदादा सावंत आणि संगीतातील जाणकार श्री.प्राणेश पोरे सर यांनी या स्पर्धेसाठी जवळपास ७००० किलोमीटर प्रवास करुन महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सहभागी शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षण केले.या दोनही परीक्षकांच्या उपस्थितीत २६ जानेवारी रोजी पोफळी प्रशालेतील पाचवी ते नववीच्या २०० मुला मुलींनी एका तालात एका सुरात गायलेल्या ‘हा महान अमुचा हिंदुस्थान’ या समूहगीताला राज्यस्तरावर (पाचही विभागांमध्ये ) तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
१० मनाचे श्लोक १० सांगीतिक रागांमध्ये सादर करणे या अनोख्या आणि वेगळ्या आव्हानात्मक स्पर्धेमध्ये प्रशालेतील निवडक विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलेल्या सादरीकरणाचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले आणि याही स्पर्धेत राज्यातील पाच विभागांमधून प्रशालेला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.
तर पोफळी संकुलातील शिशुविहार प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व अध्यापक व सहकारी यांनी एकत्रित येऊन गायलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित जयोस्तुते जयोस्तुते या समूहगीतास कोकण विभाग स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
पोफळी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणतेही शास्त्रीय संगीत न शिकताही अतिशय सुरेल सादरीकरण करू शकतात तसेच गाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्षमता,त्यांना सहज उच्चारत येतील म्हणता येतील अशा शब्द रचना करुन प्रशालेतील कलाशिक्षक श्री.पराग लघाटे यांनी लिहिलेले व संगीतबद्ध केलेले नवीन देशभक्ती गीत व संगीतातील राग समय लक्षात घेऊन मनाच्या १० श्लोकांच्या सांगितिक रचना तयार करताना केलेला विचार व शब्दांकन विशेष कौतुकास्पद असल्याचे परिक्षक श्री.प्राणेश पोरे यांनी मनोगतातून सांगितले.
प्रशालेतील सर्व अध्यापक आणि मुख्याध्यापक श्री. सोळुंके सर यांच्या विशेष मार्गदर्शन आणि सहकार्यातून संपन्न झालेल्या या सर्व स्पर्धांमधील मिळालेल्या यशा बद्दल सर्व पालक,संस्था प्रतिनिधी व शिक्षण प्रेमी यांचेकडून कौतुक होत आहे.