रायगडमधील मोरा बंदरातील स्थानिक मच्छिमारांच्या न्याय्य हक्कांसाठी बैठक
उरण (विठ्ठल ममताबादे ) : मोरा बंदर, मोरा कोळीवाडा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील स्थानिक मच्छिमारांना विचारात न घेता रो रो जेट्टीचे काम सुरु आहे. याबाबत 2013 च्या नव्या भू संपादित कायद्याप्रमाणे मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्यामार्फत सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट करून पुनर्वसन, पुर्नस्थापना करण्याच्या अनुषंगाने व कोळी समाज बांधवाना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने व कोळी बांधवांचे विविध मागण्या प्रलंबित असल्यामुळे ओबीसी नेते राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीच्या माध्यमातून मोरा कोळीवाडा येथील आई एकविरा मंदिर येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठराव व निर्णय घेण्यात आले.
मोरा कोळीवाडा ग्रामविकास समितीच्या माध्यमातून मोरा कोळीवाडा येथील आई एकविरा मंदिर येथे कोळी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी तसेच कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना राजाराम पाटील म्हणाले की आगरी कोळी, कराडी, भंडारी, आदिवासी हे येथील जमिनीचे खरे मालक आहेत. मात्र विविध प्रकल्प, विकास कामांच्या माध्यमातून या सर्वांचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. रो रो जेट्टीचे काम 2013 च्या कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवून सदरील काम सुरु आहे. यामुळे बंदरातील 200 ते 300 नौका आणि त्यावर उपजीविका करणारे 4000 स्त्री व पुरुष हे सर्व मत्स्य व्यावसायिक सदर रो रो जेट्टीमुळे प्रकल्पबाधित होणार आहेत. ज्या भागात प्रत्यक्ष मासेमारी होती त्या भागात नौका नांगरणे, शाकारणे, मासे सुकविणे, जाळी सुकविणे, डागडुजी करणे हि कामे चालतात.या सर्व कामावर गदा येण्याची शक्यता आहे.
रो रो जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे काही राहती घरे बाधित होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन संघटित व्हा. आपल्या न्याय हक्कासाठी आपला अधिकार वाचविण्यासाठी व समुद्र किनारी असलेले राहती घरे वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढा द्या. तरच आपले हक्क व अधिकार सुरक्षित राहतील. अन्यथा सर्वांवर बेघर होण्याची वेळ येईल असे राजाराम पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांनी आम्ही न्यायालयीन लढा लढू, आम्ही सर्व एकत्र येऊ असा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी केला. यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.