रेल्वेकडून महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे साकडे
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर गाड्या सोडण्यासाठी रेल्वेची नकार घंटा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
ठाणे : मुंबईतून चिपळूण तसेच वसई मार्गे सावंतवाडी नवीन गाडी सुरू करण्याबाबत रेल्वेकडे मागील काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू असताना मुंबईतून गाडी सुरू करण्याची क्षमताच नसल्याचे अलीकडेच कोकणवासियांच्या शिष्टमंडळाला रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र, त्याचवेळी शुक्रवारी कन्याकुमारीसाठी विशेष गाडी कोकण रेल्वे मार्ग सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडून महाराष्ट्रावर होत असलेल्या अन्यायाबाबत कोकण विषयी आस्था संघटना तसेच रेल्वे अभ्यासकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधले आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे कोकणवासी रेल्वेकडे मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी, वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी गाड्यांची मागणी करत आहे. परंतु रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी मुंबईतील क्षमता, कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गाचा १४०% वापर, डब्यांची उपलब्धता किंवा रेल्वे बोर्ड अशी एक ना अनेक कारणं देऊन नकारच देत असते. मुंबई विभागात नवीन गाडी सुरु करण्यासाठी क्षमताच नसल्यामुळे मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन गाडी सुरु करता येणार नाही असे उत्तर मध्य रेल्वेने कोकण विकास समितीला हल्लीच दिले होते. मात्र,त्याच मुंबई विभागाकडे कन्याकुमारी गाडी सुरु करण्याची क्षमता आहे हे विशेष.
मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात असूनही आम्हाला किमान सोयींसाठी संघर्ष करावा लागतो हे आमचं दुर्दैव. रेल्वेच्या नवीन प्रकल्पांमध्ये तर राज्य शासनाला विनामूल्य भूसंपादन आणि ५० टक्के आर्थिक सहभाग द्यावा लागतो. एवढे करूनही राज्यातील नागरिकांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. तरी, आपण यात लक्ष देऊन रेल्वे विभागांना प्रथम महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्या सुरु करण्याला प्राधान्य देण्याची सूचना करावी.
.–अक्षय महापदी, कळवा, ठाणे
पूर्वी मुंबई कन्याकुमारी दरम्यान चालणारी जयंती जनता एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी नसल्याचे कारण देऊन पुण्याला शॉर्ट टर्मिनेट केली गेली आणि आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी देण्यात येत आहे. मग आधी सुरु असलेली गाडी पुण्याला नेलीच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यातून नेमकं काय साध्य झालं? त्याहीपेक्षा महाराष्ट्रात गाड्या सुरु करताना क्षमता नाही परंतु इतर राज्यात गाड्या सहज सुरु होऊ शकतात हा महाराष्ट्रातील नागरिकांना डिवचण्याचा प्रकार आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.