महाराष्ट्र

‘शिवा जनशक्ती पक्ष’ स्थापनेची घोषणा

लातूरमध्ये शिवा संघटनेच्या वर्धापन दिनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : काही विरोधक जाणून बुजून शिवा संघटनेच्या विरोधात अफ़वा पसरवून समाजात उभी फूट पाडत आहेत. तेव्हा अशा भूलथापानां बळी पडू नये, असे आवाहन प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी लातूर येथे केले. यावेळी शिवा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन व भविष्याचा विचार करून समाजाला, देशाला एक सक्षम नेतृत्व देण्यासाठी, गोर-गरीब, वंचित, बहुजन समाज, कष्टकरी समाजावरील झालेला अन्याय दूर करण्यासाठी शिवा जनशक्ती पक्ष स्थापन करणार असल्याची राजकीय घोषणा प्रा. मनोहर धोंडे यांनी यावेळी केली.

आजपर्यंत गेली 27 वर्षे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने समाजाचे अनेक प्रश्न सोडविले. समाजाच्या न्याय हक्कासाठी शिवा संघटना नेहमी सर्वात पुढे राहिलेली आहे. गोर गरिबांचा, सर्वसामांण्याचा व सर्व जातीधर्माचा सर्वसमावेशक म्हणून शिवा संघटना नावारूपास आली आहे. सर्व जाती धर्माचे लोक आज शिवा संघटनेत आहेत. शिवा संघटनेने समाजात उपेक्षित वंचित कष्टकरी समाजाला नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एवढी वर्षे प्रामाणिकपणे, एकनिष्टने काम करूनही शिवा संघटनेच्या पदरात पाहिजे तशा गोष्टी पदरात पडलेले नाहीत. आजही शिवा संघटनेच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. समाजात अनेक समस्या आहेत. त्या अजूनही मार्गी लागलेल्या नाहीत. शिवा संघटना या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे, असेही प्रा. धोंडे म्हणाले.

वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय्य हक्कासाठी संपूर्ण भारतभर कार्यरत असणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना या सामाजिक संघटनेचे 27 वे वर्धापन दि 28/1/2023 रोजी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत बिडवे लॉन्स, राजीव गांधी चौक, औसा रोड, लातूर येथे मोठ्या उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

यावेळी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शिवा संघटना प्रा. मनोहरराव धोंडे, शंकरलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी ,सुधाकर श्रृंगारे खासदार लातूर, संजय बनसोडे माजी राज्यमंत्री, बब्रुवान खंदाडे माजी आमदार,शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेटे पुणे, डॉ .वाय बी सोनटक्के मुंबई राष्ट्रीय उपाध्यक्ष, वैजनाथ तोनसुरे राज्य उपाध्यक्ष, धन्यकुमार शिवनकर राज्य सरचिटणीस, विठठल ताकबिडे नांदेड राज्य सरचिटणीस कर्मचारी महासंघ, मनिष पंधाडे शिवा सोशल मिडिया राज्य अध्यक्ष, रुपेश होनराव राज्य सरचिटणीस ,राज्य संघटक नारायण कणकणवाडी,सुनिल वाडकर राज्य उपाध्यक्ष, सातलिंग स्वामी राज्य चिटणीस, स्वागतध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे यांच्यासह जिल्हा प्रमुख व कडवट मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोहर धोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पुढे मनोहर धोंडे सर म्हणाले की 2014 साली भाजप शिवसेना युती सोबत मैत्री केली. शिवसेना भाजप युतीला मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेउन सर्वच जागांसाठी शिवा संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला.तेंव्हा या महायुती कडुन एक घटक पक्ष म्हणून शिवा संघटनेला अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र ती आजही पूर्ण झालेली नाहीत.भाजप व शिवसेनेकडून शिवा संघटनेची फसवणूक झाली. कोणत्याही गोष्टी त्यावेळी शिवा संघटनेच्या पदरात पडल्या नाहीत. त्यानंतर 2019 च्या आमदारकीच्या निवडणुकीत मागचा अनुभव बघता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना जाहीर पाठिंबा दिला.त्यामुळे अनेक उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आले. ही शिवा संघटनेची खरी ताकद आहे. शिवा संघटने मध्ये एखाद्या उमेदवाराला जिंकून आणण्याची ताकद आहे. तर शिवा संघटनेने ठरविले तर एखाद्याला निवडणुकीत पाडण्याची, हरविण्याची सुद्धा ताकद आहे. मात्र जेव्हा जेव्हा शिवा संघटनेने विविध राजकीय पक्षाकडे वाटा घाटी केल्या, चर्चा केल्या. विविध मागण्या बाबत चर्चा केल्या तेंव्हा कोणत्याही राजकीय पक्षाने शिवा संघटनेचा कोणत्याही प्रकारे योग्य तो सन्मान केला नाही. त्यामुळे हा मागील अनुभव पाहता आता आपली ताकद दाखविण्याची खरी वेळ आली आहे. माझी स्वतःची इच्छा नसली तरी केवळ शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर एका नवीन राजकीय पक्षाची घोषणा करीत आहे. शिवा जनशक्ती पक्ष असे या पक्षाचे नाव असून 20 फेब्रुवारी 2023 रोजी याबाबत पुन्हा एकदा बैठक मुंबई येथे संपन्न होणार आहे. ओबीसी समाजातील, बहुजन समाजातील सुमारे 18 संघटनानीं शिवा संघटनेच्या शिवा जनशक्ती पार्टी या नावाला व राजकीय पक्ष स्थापन करण्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजातील अठरा पगड जाती,बहुजन समाज आपल्या सोबत आहे. समाजाला, राजकीय पक्षांना आपली किंमत मतपेटीतून सर्वांना कळाली पाहिजे. म्हणूनच नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.असे मनोहर धोंडे यांनी यावेळी सांगितले.

लातूर जिल्ह्यातील गरुड चौक, नांदेड नाका येथून ते बिडवे लॉन्स येथ पर्यंत भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आली. टू व्हीलर,फोर व्हीलर वाहणानी आपल्या वाहणावर शिवा संघटनेचे बॅनर, झेंडे लावले होते. बिडवे लॉन्स मधील वर्धापन कार्यक्रम स्थळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत दत्ता खंकरे यांनी केली.शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांतअप्पा शेट्टे यांनी यावेळी प्रस्तावना केली.प्रस्तावनेत त्यांनी शिवा संघटनेचे कार्य, भूमिका तत्व यांची माहिती दिली. व वर्धापन दिन साजरी करण्या पाठीमागची भूमिका स्पष्ट केली.उमाकांत अप्पा शेट्टे यांनी स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. समाजात मतभेद करून समाज तोडण्याचे, समाजात भांडणे लावण्याचे काम ही मंडळी करत असून अशांना अजिबात थारा देऊ नका. स्वतंत्र लिंगायत धर्माच्या नावाने ही मंडळी आपली पोळी भाजून घेत आहेत अशा स्वार्थी लोकांपासून दूर रहा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होनराव यांनीही आपापली मनोगते व्यक्त करून शिवा संघटनेच्या कार्याचे कौतुक करत सर्वांना शिवा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस रुपेश होनराव यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित मान्यवर, शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानून रुपेश होनराव यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता शिवा संघटनेच्या नियमानुसार राष्ट्रगीताने झाली .या वर्धापन दिनाला महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातील शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी नवीन राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत, या निर्णयाचे स्वागत करत हलगी वादनावर नृत्य करत एकच जल्लोष केला.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button