संगमेश्वरमध्ये भरधाव ट्रकने बैलाला ठोकरले
बैलाचे पुढील पाय तुटले ; तरुणांनी केले उपचार
संगमेश्वर ( प्रतिनिधी ):- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकचालकाने बैलाला जबरदस्त ठोकर दिली. यामध्ये बैलाचे पुढील दोन्ही पाय तुटले आणि तो जागेवरच बसला. संगमेश्वर येथील काही तरुणांना हे वृत्त समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बैलावर प्राथमिक उपचार केले.
संगमेश्वर येथे मोकाट जनावरे महामार्गावरून नेहमीच फिरत असतात. या प्रश्नाकडे लक्ष द्यायला आणि मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करायला कोणालाही वेळ नसल्याने एक एक मोकाट जनावर मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे. महामार्गावर भरधाव ट्रकने अशीच एका बैलाला जोरदार धडक दिली आणि यामध्ये बैलाचे पुढील पाय तुटले. हे वृत्त संगमेश्वर येथील तरुणांना कळताच संतोष खातू, निखिल लोध आणि मित्रमंडळींनी तातडीने बैलावर प्राथमिक उपचार केले आणि अशा जनावरांचा सांभाळ करणाऱ्या खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेजवळ संपर्क साधला. त्यांना विषयाचे गांभीर्य सांगितले आणि टेंपोमधून जखमी बैलाला लोटे गोशाळेत सुखरुप पाठवले.
प्राण्यांप्रति सहहृदयता दाखवणाऱ्या संतोष खातू , निखिल लोध आणि त्यांच्या मित्रमंडळाने प्रसंगावधानाचे कौतुक करण्यात येत आहे.