स्वतःसाठी घर आणि वृद्धांसाठी उभारला १८ खोल्यांचा सुसज्ज आश्रम!
देवरुखजवळ पालकर फाऊंडेशन निर्मित ‘सिनिअर सिटीझन होम’चे २२ रोजी उद्घाटन
देवरूख ( सुरेश सप्रे) : देवरुखजवळील विघ्रवली माळवाडी या ठिकाणी पालकर दांपत्याने स्वत: साठी जांभ्या दगडाच्या बांधकामात अतिशय टूमदार हवेशीर घरही बांधले आहे. मात्र, सामजिक बांधिलकेच्या जाणीवेतून अठरा खोल्यांचे सुसज्ज वृध्दाश्रम देखील उभारला आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात आजी-आजोबांसाठी वाचनालय, मनोरंजन, योगाभ्यास, लिप्ट अशा सोयी सुविधेने परिपूर्ण असलेल्या वृद्धाश्रमाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.
वयोवृद्धांची राहण्याची उत्तम सोय व्हावी, यासाठी शुद्ध, सात्विक, शाकाहारी आहार प्रशिक्षित काळजीवाहू कर्मचारी वर्गासह आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका सेवेसह निसर्गाच्या सानिध्यात १८ खोल्यांचे प्रशस्त संकुलाचा उद्घाटन सोहळा रविवार दि. २२ रोजी पालक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
कोकणामध्ये मोकळ्या किंवा पडिक चिरेखाणींचा मत्स्य व्यवसायासाठी अतिशय कल्पकतेने वापर करुन विजय पालकर दांपत्याने आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.कोकणात आंबा , काजू या गोष्टी पिकतातच पण यापेक्षा ऊस,कॉफी,हळद ,काळीमिरी यांचे सुध्दा भरघोस उत्पादन मिळू शकते हे पालकर दांपत्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
सेंद्रीय शेती यावर त्यांचा मुख्य भर असल्यामुळे त्यानी या ठिकाणी शेणखतासाठी गो पालन, शेळी पालन आणि कुकुटपालन हे तीन कुटीर व्यवसाय सुध्दा सुरु केले आहेत. आज त्यांच्याकडे दर्जेदार शेळ्या मेंढ्या आहेत. त्यात कोकणकन्याळ, अफ्रीकन गोट, उस्मानीबादी या सारख्या विविध जातीच्या शेळ्या आहेत. तसेच पाचशेहून अधिक कोंबड्या आहेत.
शेतात उत्पादित होणारा ऊस स्थानिक देवरूख बाजारपेठेत उसाचा ताजा रस काढून विकला जातो तर जास्तीचा उस सेंद्रीय गुळ निर्मिती साठी वापरला जातो. अंडी आणि चिकन सुध्दा स्थानिक पातळीवर विकण्यात येते.
मुळात शिक्षण, व्यवसाय हे मुंबईसारख्या माया नगरीत होवून सुध्दा वयाच्या 72 व्या वर्षी सुध्दा पालकर यांचे कार्य आणि उमेद तरुणांना लाजवणारी आहे. कोकणची लाल मातीने त्यांच्यातील कृतीशिलतेला साद घातल्यामुळे आणि पत्नीची आणि सुध्दा समर्थ साथ लाभल्यामूळे माळरानावर आनंदाचा आणि रोजगार निर्मितीचा मळा व वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम आपण फुलवू शकलो, असे विजय पालकर अभिमानाने सांगतात.
कुतूहल म्हणून कॉफीची लागवड हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी कॉफीची रोपे आणून त्यांची विघ्रवली येथे लागवड केली . मात्र कॉफीची रोपे योग्य निगा आणि काळजी घेतली तर चांगले उत्पादन देवू शकतात हे जाणवल्यामुळे कॉफीची एक हजार रोपांची लागवड करण्यात आली. आता त्याना बर्यापैकी फुल धारणा होऊ लागली आहे.
यानंतर काय बाबत माहिती देताना उद्योजक विजय व सौ.भारती पालकर यांनी आगामी वर्षात या ठिकाणी काजुंच्या टरफळा पासून तेल निर्मीती, हळद प्रक्रीया उद्योग आणि फळ प्रक्रीया , पशू आणि मत्स्य खाद्य निर्मीती उद्योग सुरु करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले.