९ जूनच्या मुंबई-मडगाव जनशताब्दीने जाणार आहात?तुमचा उडू शकतो गोंधळ!!
रत्नागिरी : तुम्ही जर कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणार असाल आणि त्यातही जर दि. ९ जून २०२३ रोजी मुंबई मडगाव जनशताब्दी ने प्रवास करणार असाल तर तुमचा गोंधळ उडू शकतो. अवघ्या २० मिनिटांच्या फरकाने एकाच मार्गावर दोन सेम टू सेम कोच रचना असलेल्या गाड्या धावणार असल्यामुळे तुम्हाला अलर्ट राहावे लागणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना लागू होणारे पावसाळी वेळापत्रक दिनांक 10 जून 2023 पासून अमलात येणार आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांसाठी वेग मर्यादा असलेले स्वतंत्र पावसाळी वेळापत्रक आखले जाते. भारतीय रेल्वेच्या इतर झोनमधून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या देखील पावसाळी वेळापत्रकानुसार धावतात.
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकानुसार मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही दोन रेकसह चालवली जाते. बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार मात्र जी गाडी मुंबईतून गोव्याला जाते, तीच गाडी गोव्यातून मुंबईपर्यंतचा प्रवास करते. दिनांक 10 जून पासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव दरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेससाठी दुसऱ्या टोकाला (मडगाव) देखील तिथून सुटण्यासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबईतून गोव्यात मडगाव पर्यंत वन वे स्पेशल गाडी दिनांक 9 जून रोजी चालवली जाणार आहे.
मुंबई सी एस एम टी -मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (12051) ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रोज पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी सुटते तर दिनांक 9 जून रोजी याच सीएसएमटी स्थानकावरून जनशताब्दी एक्सप्रेससारखीच कोचरचना असलेली दुसरी एक सेम टू सेम गाडी (01149) ही मुंबई- मडगाव वनवे स्पेशल गाडी म्हणून धावणार आहे. दिनांक 9 जून रोजी या दोन्ही गाड्या केवळ वीस मिनिटांच्या फरकाने एकाच मार्गावर धावणार असल्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडू शकतो. आपली गाडी ही कि ती, असा प्रवाशांना संभ्रम पडू शकतो. यासाठी प्रवाशांना फलाटावर तिची केली जाणारी उद्घोषणा, गाडीचा क्रमांक याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.