Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसचे रत्नागिरी स्थानकावर जोरदार स्वागत
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील पहिली आणि महाराष्ट्रातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारपासून कोकण रेल्वे मार्गावर धावू लागली आहे. मडगाव – मुंबई या शुभारंभाच्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दुपारी ३ वाजून 37 मिनिटांनी रत्नागिरी स्थानकावर दाखल झालेल्या पहिल्या वंदे भरत एक्सप्रेसचे रत्नागिरीकरांनी जोरदार स्वागत केले.
वंदे भारत एक्सप्रेस या स्वागतासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रवींद्र कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष एड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभाचा क्षण अवश्य पहा : https://youtu.be/5bjfOvFgo9g
सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांनी हिरवा बावटा दाखवल्यानंतर विशेष निमंत्रितांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. कोकण रेल्वे मार्गावरील पहिली वंदे भारत एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर दुपारी तीन वाजून 37 मिनिटांनी दाखल झाली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या उच्च तंत्रज्ञानयुक्त या हायटेक ट्रेनच्या स्वागतासाठी रत्नागिरीकरांनी स्थानकावर गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात शुभारंभाची गाडी स्थानकावर दाखल होताच फुलांचा वर्षाव करत तिथे स्वागत करण्यात आले. यावेळी पहिल्या गाडीचे लोको पायलट ए. के. कश्यप यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गाडी पाहण्यासाठी उपस्थित अनेक नागरिकांनी वंदे भारत एक्सप्रेससह सेल्फी काढण्यासह या हायटेक ट्रेनच्या स्वागताचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपले.
वंदे भारत एक्सप्रेस सरत्नागिरी स्थानकावरील स्वागताचा क्षण इथे पहा : https://youtu.be/48Ka3-9cIis