नाणीजला आज लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारी शोभायात्रा
यागाने गजानन महाराज प्रकटदिन सोहळा सुरु
नाणीज : येथे आज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचा जयंती सोहळा उत्साहात सुरू झाला. सुदंरगडावर गजानन महाराज मंदिरात श्रीं च्या पूजनाने व सप्तचिरंजीव महामृत्यूनंजय . यागाने सोहळ्यास सुरुवात झाली. दरम्यान उद्या मुख्य दिवस असून सकाळी भव्य शोभायात्रा असेल.
सुंदरगडावर आज सकाळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, प.पू. कानिफनाथ महाराज व देवयोगी यांचे भाविकांच्या जयघोषात आगमन झाले. त्यांनी संत शिरोमणी गजानन महाराज -मंदिरात मूर्तींचे दर्शन घेतले, आरती केली. त्यानंतर सप्तचिरंजीव महामृत्युंजय यागास सुरुवात झाली.
दुपारी वरद चिंतामणी मंदिर व प्रभू रामचंद्र मंदिर व मुख्य श्री गजानन महाराज मंदिर येथे मिरवणुकीने जाऊन सर्व देवदेवतांना सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले. त्याची जबाबदारी अनुक्रमे गोवा उपपीठ, दक्षिण रायगड व भंडारा जिल्हा सेवासमित्यांवर सोपविण्यात आली होती.
दरम्यान उद्या सोमवारी सकाळी ८ वाजता भव्य शोभयात्रा नाथांचे माहेर येथून सुरू होईल. ती दुपारी सुंदरगडावर जाईल. त्यात महाराष्ट्र व इतर राज्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या मिरवणुकीत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील कला सादर करणारी पथके असतील. समाजप्रबोधनात्मक देखावे असतील. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आदी राज्यांतील लोकसंस्कृतीचे दर्शनदेखील येथे घडणार आहे.
रात्री भाविकांचे आकर्षण असलेले प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता होईल.
आज सकाळी नऊ वाजता सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज दवाखान्यात मोफतआरोग्य शिबीर सुरू झाले. येथे विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर तपासणी व उपचार करीत आहेत. उद्याही दिवसभर हे शिबीर सुरू आहे.
या सोहळ्यानिमित्त २४ तास महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक शिस्तीने त्याचा लाभ घेत आहेत.
सोहळ्यासाठी काल व आज मिळेल त्या वाहनाने भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सुंदरगडावरील सर्व मंदिरात दर्शनासाठी गर्दी आहे. उद्या गर्दी आणखी वाढणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त चोख आहे. एस. टी. ने जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.