राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अमेय सावंत आणि राज्य कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा यांचा सत्कार
रत्नागिरी : एसआरके तायक्वांदो क्लब रत्नागिरी यांच्यातर्फे राज्य संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. व्यंकटेश कररा आणि राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या अमेय सावंत यांचा गौरव करण्यात आला.
जोगळेकर हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डी.वाय.एस.पी. सदाशिव वाघमारे, निवृत्त पोलीस अधिकारी सासणे साहेब, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपीन बंदरकर, उद्योजक दीपक पवार, जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष शशांक घडशी क्लब उपाध्यक्ष अमोल सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यंकटेश कररा यांनी 2002 पासून तायक्वांदो हा खेळ जिल्ह्यात रुजवायला सुरुवात केली. संपूर्ण जिल्ह्यातील मुलांना या क्रीडाप्रकाराची ओळख करून दिली. गेल्या 20 वर्षात अनेक गुणी खेळाडू घडले. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या कोषाध्यक्षपदी व्यंकटेश कररा यांची निवड झाली. त्याबद्दल एस आर के तायक्वांदो क्लबच्यावतीने त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
एसआरके तायक्वांदो क्लब मारुती मंदिर रत्नागिरीचा खेळाडू अमेय अमोल सावंत याने विशाखापट्टणम येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. संपूर्ण जिल्ह्यात ज्युनिअर या गटात हे प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदक मिळालं आहे. या यशासाठी एसआरके तायक्वांदो क्लबतर्फे गौरविण्यात आले. एस आर के तायक्वांदो क्लबचे शाहरुख शेख यांची विशाखापट्टणम इथल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली होती.
त्यासाठी त्यांचाही सर्व पालकवर्गातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी तायक्वांडो प्रशिक्षक प्रशांत मकावाना मिलिंद भागवत स्वप्नील दांडेकर, प्रशांत मेस्त्री सर्व खेळाडू, पालकवर्ग उपस्थित होता.