तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) या अधिकृत राष्ट्रीय संघटनेला भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. तसेच तायक्वांदो खेळातील अधिकृत राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणूनही मान्यता दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त समितीने निवृत्त न्यायाधीश जी. एस. सस्तानी यांच्या निरीक्षणाखाली ‘टीएफआय’ची निवडणूक इंडियन ऑलिम्पिकच्या कार्यालयात पार पडली. यामध्ये ‘टीएफआय’चे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश इशारी, महासचिवपदी आर. डी. मंगेशकर, कोषाध्यक्षपदी जस्वीरसिंह गिल यांची निवड करण्यात आली. याच राष्ट्रीय महासंघाने महाराष्ट्रात तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ‘ताम’च्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे, महासचिवपदी मिलिंद पठारे व कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा यांच्या ‘ताम’ मुंबई या राज्य संघटनेला मान्यता दिली आहे. या अभिनंदनीय निवडीमुळे महाराष्ट्रातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व अधिकृत जिल्हा संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
