दापोलीची सानिका भाटकर खेळणार महाराष्ट्राच्या कबड्डी संघात
सनिका कोळथरेतील दुर्गामाता क्रीडा मंडळाची कबड्डीपटू
दापोली : नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीमध्ये दापोलीतील कोळकर येथील दुर्गामाता क्रीडा मंडळाची खेळाडू कु. सानिका संजय भाटकर हिची महाराष्ट्राच्या संघातून खेळण्यासाठी निवड झाली आहे.
कोळथरे येथील दुर्गामाता क्रीडा मंडळाचा मुलींचा कबड्डी संघ आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध झालेला आहे. आजपर्यंत अनेकदा विविध वयोगटातून, कोळथरेच्या अनेक कबड्डी खेळाडू जिल्ह्याला, राज्याला स्पर्धेत खेळल्या असून त्यांनी स्वतःची छाप उमटवलेली आहे.
क्रीडा मंडळाचे कबड्डी प्रशिक्षक सचिन चव्हाण यांची प्रचंड मेहनत या सर्व मुलींना तयार करण्यासाठी अखंड सुरू असते. रोजचा व्यायाम, रोजचा मैदानी सराव, कौशल्य विकास ई. च्या माध्यमातुन चव्हाण आपल्या संघाला अधिकाधिक तरबेज बनवत आहेत. दापोली तालुक्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणी मध्ये दुर्गामाता क्रीडा मंडळाची खेळाडू – कु.सानिका संजय भाटकर हिची महाराष्ट्राच्या संघातून खेळण्यासाठी निवड झालेली आहे. सहावी कुमार गट मुले मुली फेडरेशन ची स्पर्धा मदुराई, तामिळनाडू येथे जानेवारी महिन्यात होत आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात दुर्गामाता क्रीडा मंडळाची खेळाडू चमकणार आहे. आमच्या साठी विशेष आनंदाची बाब असल्याचे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी सांगितले.