नेमबाजीत महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळेला रौप्य तर स्वराज भोंडवेला कांस्यपदक
खेलो इंडिया युथ गेम्स २०२२-२३
भोपाळ : महाराष्ट्राच्या ईशा टाकसाळे हिने रौप्यपदक तर स्वराज भोंडवे याने कांस्यपदक पटकावीत नेमबाजीत महाराष्ट्राचे खाते उघडले.
मुलींच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशा हिने सुरेख कौशल्य दाखवीत पदकावर आपले नाव कोरले. ती पनवेल येथे ज्येष्ठ प्रशिक्षिका सुमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे ती यंदा दहावीची परीक्षा देत असूनही शाळा, अभ्यास आणि नेमबाजीचा सराव या तीनही गोष्टी व्यवस्थित सांभाळून वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते. ती दररोज साडेतीन तास नेमबाजीचा सराव करीत आहे. तिने आजपर्यंत राज्य व अखिल भारतीय स्तरावर भरघोस पदकांची कमाई केली आहे. नेमबाजीतच करिअर करण्याबाबत तिला घरच्यांकडून सतत पाठिंबा मिळत आहे. ती मुंबई येथील एम एन आर विद्यालयात शिकत असून शाळेकडूनही तिला चांगले सहकार्य मिळत आहे.
मुलांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात स्वराजला कांस्यपदक मिळाले. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथमच सहभागी झाला असून पदार्पणातच त्याने पदकाचे स्वप्न साकार केले आहे. तो पुण्यातील गन फॉर ग्लोरी अकादमीत श्री. सी के चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने नेमबाजीच्या खेळात सुरुवात केली आणि या छोट्याशा काळामध्ये त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. मिटकॉन इंटरनॅशनल प्रशालेत तो शिकत असून शाळेकडूनही त्याला खेळासाठी प्रोत्साहन मिळत आहे.