स्पोर्ट्स

राज्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क्रीडाज्योत रायगडावरून पुण्याकडे रवाना

खेळाने आयुष्यमान वाढते : पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर

अलिबाग : राज्य ऑलिंपिक स्पर्धेसाठी रायगडावर गुरुवारी क्रीडाज्योत प्रज्वलित करून ती मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्याकडे रवाना झाली.

सध्याच्या धकाधकीच्या काळात मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे असून ते नियमित खेळल्याने आयुष्यमान वाढण्यास मदत होते, असे मत महाड येथील पद्मश्री डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी दुर्ग रायगड येथे बुधवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेच्या मुख्य ज्योत प्रज्वलन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

या प्रसंगी महाड प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी अमित गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, यांच्यासह पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या पत्नी श्रीमती बाविस्कर, सुप्रसिद्ध वेटलिफ्टर प्रतिक्षा गायकवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, शिव छत्रपती पुरस्कार विजेते श्री संजय कडू, क्रीडा विभागाचे निवृत्त सहाय्यक संचालक उदय पवार, कुस्ती या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, ऑलिंपियन अजित लाकरा, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जगदाळे, सिद्धेश शिर्के, दीव्यांग खेळाडू तसेच स्थानिक पदाधिकारी, शासकीय अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


याप्रसंगी राज्य ऑलिंपिक स्पर्धेला शुभेच्छा देताना पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी सार्वजनिक जीवनात खेळाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये व संगणकीय क्षेत्रात असलेली तरुण पिढी लक्षात घेता मैदानी खेळांचे महत्त्व ओळखून आयुष्यात दररोज खेळ खेळल्यास आयुष्यमान वाढण्यास मदत होते, असा विश्वास व्यक्त करून भावी पिढीने दैनंदिन स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे खेळ नियमितरित्या खेळावेत, असे आवाहन केले.
महाडच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांनी स्थानिक प्रशासनास राज्य ऑलिंपिक स्पर्धेच्या या ज्योत प्रज्वलनप्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मिळाले ही भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून 22 वर्षानंतर महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या या ऑलिंपिकची ज्योत महाड मधील सुप्रसिद्ध वेटलिफ्टर प्रतिक्षा गायकवाड यांच्यासह राज्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त महिला खेळ क्रीडापटूंकडून पुणे येथील स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यात येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला व या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.


हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरून सकाळी राजसदरेवरून ही ज्योत प्रज्वलित करून होळीचा माळ छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी येथून पाचाड माणगाव मार्गे पुणे येथे होणाऱ्या राज्य ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी महिला क्रीडापटूंकडून नेण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाच्या संयोजकांकडून देण्यात आली आहे.


तसेच रायगडावर उपस्थित लहान चिमुकली शिवण्या भूषण शिसोदे आणि राजकन्या भूषण शिसोदे या दोघींनी छत्रपती शिवाजी महाराजांची गारद दिली. ढोल पथकांनी किल्ले रायगड दणाणून गेला. तसेच तुतारी वाजविण्यात आली आणि उपस्थित खेळाडूंनी महाराजांचा जयघोष केला..
या ज्योतीचे किल्ले रायगडावरून पाचाड येथे उतरल्यानंतर तसेच माणगाव मध्ये स्थानिक प्रशासन व विविध क्रीडा संस्थांचे पदाधिकाऱ्यांमार्फत शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button