फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन २०२३” स्पर्धा १९ फेब्रुवारीला
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने रविवार,दि.19 फेब्रुवारी, 2023 रोजी “फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथून या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.
ही स्पर्धा एकूण 10 गटात आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये 14 वर्षाखालील मुले व मुली, 18 वर्षाखालील मुले व मुली आणि पुरुष, महिला असे गट असून 5 किमी.,10 किमी.आणि 21 किमी.अशा अंतराची ही स्पर्धा आहे.
14 व 18 वर्षाखालील मुले व मुली गटासाठी 5 किमी अंतर असून पुरुष व महिला गटातील धावपटू 5 किमी, 10 किमी किंवा 21 किमी या एका स्पर्धेत सहभागी होवू शकतात. बुधवार दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी https://forms.gle/DrmsogAsGMirai9EA या लिंकवर करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूना टी शर्ट, सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, प्रावीण्य प्रमाणपत्र व पदक देण्यात येणार आहे.
रविवार, दि.19 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 5 वाजता सर्व धावपटूनी छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्वप्रथम झुम्बा डान्स, त्यानंतर 5.45 वाजता 21 किमीच्या स्पर्धेला प्रारंभ होईल.6.05 मिनिटांनी 10 किमी ची स्पर्धा सुरु होईल.6.20 वाजता 5 किमी स्पर्धेस प्रारंभ होणार आहे.
5 किमी गटासाठी धावमार्ग छत्रपती शिवाजी स्टेडियम ते भाटये पूल व परत असा मार्ग असून 10 किमी गटासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम ते झरी विनायक मंदिर ते परत असा धावमार्ग आहे तर 21 किमी गटासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियम ते मुकुल माधव विदयालय व परत असा मार्ग आहे.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.